पुण्यात आयटी कंपनीत काम करणाऱ्या विवाहितेची आत्महत्या; सासूविरुद्ध छळप्रकरणी गुन्हा दाखल
मानसिक आणि शारीरिक छळप्रकरणी सासूविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा..
पुण्यातील हांडेवाडी रोडवरील 29 वर्षीय आयटी महिला कर्मचाऱ्याची आत्महत्या; मानसिक आणि शारीरिक छळप्रकरणी सासूविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा..
सायली मेमाणे
पुणे,२३ जून २०२५ : हांडेवाडी रोडवरील ड्रीम एलीगन्स सोसायटीत राहणाऱ्या एका 29 वर्षीय आयटी क्षेत्रातील महिलेनं घरात आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात तिच्या सासूविरोधात छळ व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा कालेपाडळ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
मृत महिलेचे नाव दीपिका प्रमोद जाधव (वय २९) असून ती २०१७ पासून पती, दोन मुलं आणि सासरच्या मंडळींसोबत पुण्यात राहत होती. तिचे मूळ गाव रायगड जिल्ह्यात असून तिच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून सासूविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 108 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि 85 (सासरच्यांकडून विवाहितेवर शारीरिक वा मानसिक क्रूरता) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधिकृत प्रसिद्धिपत्रकानुसार, दीपिकाची सासू तिला सतत माहेरून पैसे आणण्यास सांगत होती. तिच्यावर वेळोवेळी शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात येत होता. अखेर 20 जून रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास तिने राहत्या घरी गळफास घेतल्याची घटना घडली.
या घटनेबाबत बोलताना तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास सुतार म्हणाले, “घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. मृत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.” पोलिसांच्या माहितीनुसार, दीपिका ही एमबीए पदवीधर असून पुण्यातील एका आयटी कंपनीत कार्यरत होती.
सध्या या प्रकरणात फक्त सासूविरुद्धच गुन्हा दाखल झाला आहे. मात्र पोलीस विविध अंगाने तपास करत आहेत आणि आणखी दोषी असल्यास त्यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये पुण्यातील अंबेगाव भागातही अशाच प्रकारे छळामुळे शिक्षक महिलेने पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेत तिचा सहा वर्षांचा मुलगाही बळी गेला होता. पोलिसांना त्या ठिकाणी मृत महिला मयुरी देशमुख (वय ३१) हिची सुसाइड नोट सापडली होती. त्या प्रकरणात पुढील तपासात पतीला अटक करण्यात आली होती.
या दोन घटना एकंदरीतच विवाहित महिलांवरील कौटुंबिक छळ किती गंभीर स्वरूप धारण करत आहे, याचे प्रतिबिंब आहेत. समाजातील अशा प्रकारांवर कठोर कारवाईसह वैवाहिक महिला सक्षमीकरण हाच यावरचा प्रभावी उपाय आहे.
Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz
1 thought on “पुण्यात आयटी कंपनीत काम करणाऱ्या विवाहितेची आत्महत्या; सासूविरुद्ध छळप्रकरणी गुन्हा दाखल”