अभिमानास्पद! मोलमजुरी करणाऱ्या आदिवासी कुटुंबातील नऊ मुली होणार डॉक्टर

1
जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर कोणतेही स्वप्न साकार करता येते, हे किनवट तालुक्यातील आदिवासी मुलींनी दाखवून दिले आहे.

जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर कोणतेही स्वप्न साकार करता येते, हे किनवट तालुक्यातील आदिवासी मुलींनी दाखवून दिले आहे.

नांदेड जिल्ह्यातील किनवट येथील आदिवासी कुटुंबातील नऊ मुलींनी NEET परीक्षा उत्तीर्ण करून डॉक्टर बनण्याचा मार्ग खुला केला. ही यशोगाथा प्रेरणादायी आहे.

सायली मेमाणे

नांदेड २३ जून २०२५ : जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर कोणतेही स्वप्न साकार करता येते, हे किनवट तालुक्यातील आदिवासी मुलींनी दाखवून दिले आहे. हलाखीच्या परिस्थितीतही NEET 2025 परीक्षेत नऊ मुलींनी यश संपादन करत वैद्यकीय शिक्षणाच्या दिशेने मोठे पाऊल टाकले आहे. यात चार जणी MBBS तर पाच जणी BAMS साठी पात्र ठरल्या असून, त्यांचं यश संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

ही यशोगाथा आहे मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील, घरात ना मोबाईल ना इंटरनेट – फक्त पुस्तके आणि जिद्द यांच्या साथीने या मुलींनी अभ्यास केला. सोशल मीडियापासून दूर राहून त्यांनी सकाळपासून रात्रीपर्यंत वेळेचे काटेकोर नियोजन करत अभ्यासात स्वतःला झोकून दिलं. सकाळी ७ ते १२ क्लास, नंतर डाऊट सेशन, दुपारी थोडा विश्रांतीचा वेळ आणि पुन्हा रात्री १ वाजेपर्यंत अभ्यास – असा त्यांचा दिनक्रम होता.

या यशस्वी मुलींपैकी MBBS साठी पात्र ठरलेल्या विद्यार्थिनी म्हणजे मनिषा विजय वाळके, रेखा अर्जुन कन्नाके, शिल्पा सत्यवृत्त गारूडे, त्रिशा वाघडव. तर BAMS साठी पात्र ठरलेल्या विद्यार्थिनी आहेत शोभा सुदर्शन डवरे, रेशमा वैजनाथ डूकरे, प्रतिभा मारोती ढोले, पल्लवी मारोती पाचपुते आणि लक्ष्मी माधव देशमुखे.

या मुलींना शिक्षणासाठी नांदेड येथे खास कोचिंगमध्ये मोफत प्रशिक्षण मिळालं. रहाण्यासाठी वसतीगृहात ५०% सवलत देण्यात आली होती. उर्वरित तीन मुलींना ‘लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट’ या स्वयंसेवी संस्थेमार्फत धाराशिव येथे ठेवण्यात आले. प्रकल्प समन्वयक नामदेव केंद्रे यांच्या माहितीनुसार, १५ विद्यार्थ्यांपैकी नऊ जणींनी NEET परीक्षेत यश मिळवलं आहे.

या सर्व मुली बोधडी आश्रमशाळेतील असून, शासनाच्या आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत त्यांचे शिक्षण झाले. दोन वर्षांपूर्वी तत्कालीन प्रकल्पाधिकारी नेहा भोसले (IAS) यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे या यशाचे बीज रोवले गेले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली Medical प्रवेशासाठी विशेष तयारी सुरू करण्यात आली होती.

या विद्यार्थिनींच्या पालकांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. बहुतेक पालक मजुरीसाठी वर्षातील सहा महिने बाहेर गावी जातात. काही विद्यार्थिनी अनाथ असून त्यांच्या जबाबदाऱ्या आजी किंवा नातेवाईकांवर आहेत. त्यामुळे पुढील वैद्यकीय शिक्षणासाठी लागणारा खर्च त्यांच्यासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने या विद्यार्थिनींचे पालकत्व स्वीकारून आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे.

या यशस्वी मुलींनी दाखवलेला संयम, कष्ट आणि चिकाटी आजच्या पिढीला मार्गदर्शक ठरेल. शिक्षण, विशेषतः वैद्यकीय शिक्षणासाठी कितीही अडथळे आले तरी ते मात करता येतात, हे या मुलींनी सप्रमाण सिद्ध केलं आहे.

Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz

1 thought on “अभिमानास्पद! मोलमजुरी करणाऱ्या आदिवासी कुटुंबातील नऊ मुली होणार डॉक्टर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *