First electric airplane flight | फक्त 700 रुपयांत 130 किमी अंतर! ‘Alia CX300’ या इलेक्ट्रिक विमानाने उड्डाणाचं भविष्य बदललं
'Alia CX300' या इलेक्ट्रिक विमानाने उड्डाणाचं भविष्य बदललं
Alia CX300 या पहिल्या इलेक्ट्रिक प्रवासी विमानाने 130 किमी प्रवास अवघ्या 700 रुपयांत केला; हवाई प्रवास स्वस्त व प्रदूषणमुक्त करण्याची दिशा.
सायली मेमाणे
पुणे २३ जून २०२५ :अमेरिकेतील बीटा टेक्नॉलॉजीज या स्टार्टअप कंपनीने हवाई प्रवासाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. त्यांच्या ‘Alia CX300’ या पूर्णपणे इलेक्ट्रिक प्रवासी विमानाने नुकतेच 130 किमी अंतर अवघ्या 694 रुपयांत (8 डॉलर) पार करत हवाई प्रवासाला नवीन दिशा दिली आहे. न्यूयॉर्कच्या ईस्ट हम्पटन येथून जॉन एफ. केनेडी (JFK) आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत अवघ्या 35 मिनिटांत चार प्रवाशांनी हा प्रवास केला. इतक्या कमी किमतीत आणि कमी वेळेत पार पडलेला हा प्रवास आता जागतिक स्तरावर चर्चेचा विषय ठरतोय.
हेच अंतर पारंपरिक हेलिकॉप्टरने पार करताना सुमारे 13,885 रुपये (160 डॉलर) खर्च येतो, तर ‘Alia CX300’ मध्ये प्रवास करताना केवळ 700 रुपयांइतका खर्च येतो, यावरून हवाई प्रवास किती सुलभ व किफायतशीर होऊ शकतो हे स्पष्ट होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रवासात कोणतंही कार्बन उत्सर्जन होत नाही, आणि प्रवासादरम्यान आवाजही फार कमी जाणवतो. त्यामुळे प्रवाशांना एकमेकांशी शांतपणे संवाद साधता येतो.
बीटा टेक्नॉलॉजीजचे संस्थापक व सीईओ काईल क्लार्क यांनी या यशाविषयी सांगितलं, “आमचं विमान 100% इलेक्ट्रिक आहे. चार्जिंगसाठी केवळ 8 डॉलर खर्च आला आणि प्रवासही अत्यंत आरामदायक होता. यामुळे भविष्यात शहरी व उपशहरी वाहतुकीचा चेहरामोहराच बदलणार आहे.”
‘Alia CX300’ हे पूर्णतः इलेक्ट्रिक असलेलं पारंपरिक टेक-ऑफ करणारं विमान असून, एका सिंगल चार्जमध्ये तब्बल 460 किमी (250 नॉटिकल माईल्स) अंतर पार करण्याची क्षमता या विमानात आहे. त्यामुळे शहरांमधील अल्प अंतराचा प्रवास किंवा विमानतळ ते उपनगरांमधील प्रवासासाठी हे विमान आदर्श ठरू शकतं.
सध्या या विमानाच्या व्यावसायिक वापरासाठी बीटा टेक्नॉलॉजीजने 318 दशलक्ष डॉलर इतकं गुंतवणूक भांडवल उभं केलं आहे. यामध्ये उत्पादन वाढवणे, प्रमाणन आणि FAA (Federal Aviation Administration) कडून अधिकृत मान्यता मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. कंपनीचा उद्देश 2025 अखेरपर्यंत अधिकृत परवाना मिळवण्याचा आहे.
इतकंच नाही तर, 2028 मध्ये होणाऱ्या लॉस एंजेलिस ऑलिंपिकमध्ये ‘एअर टॅक्सी’ ही वाहतुकीची अधिकृत व्यवस्था म्हणून वापरण्यात येणार आहे. आर्चर एव्हिएशनसारख्या कंपन्या देखील हवाई टॅक्सीच्या क्षेत्रात भरारी घेण्यासाठी सज्ज आहेत आणि ही सेवा 2026 पासूनच सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे सर्व पाहता, बीटा टेक्नॉलॉजीजचं Alia CX300 हे विमान हे केवळ प्रयोग नव्हे तर भविष्यातील एक व्यवहार्य पर्याय ठरू शकतो. स्वस्त, शांत, वेळ वाचवणारा आणि पर्यावरणपूरक हवाई प्रवास आता सामान्य प्रवाशांपर्यंत पोहोचण्याच्या मार्गावर आहे.
Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz