पुण्यात ठराविक नाट्यगृहांनाच गर्दी; उपनगरांतील रंगमंदिरांसाठी विशेष योजना, सांस्कृतिक धोरण लवकरच
पुण्यात ठराविक नाट्यगृहांनाच गर्दी; उपनगरांतील रंगमंदिरांसाठी विशेष योजना, सांस्कृतिक धोरण लवकरच
पुण्यात मध्यवर्ती नाट्यगृहांना चांगला प्रतिसाद तर उपनगरांतील रंगमंदिरांना थंड प्रतिसाद. उपनगरांमध्ये कार्यक्रम वाढवण्यासाठी विशेष योजना आणि नव्या सांस्कृतिक धोरणाची लवकरच घोषणा.
पुणे १४ फेब्रुवारी २०२६ : पुणे शहराला सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते; मात्र शहरातील सर्व नाट्यगृहांना समान प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र सध्या स्पष्टपणे दिसून येत आहे. मध्यवर्ती भागातील काही निवडक नाट्यगृहांमध्ये सातत्याने प्रयोग आणि कार्यक्रम होत असताना उपनगरांतील अनेक रंगमंदिरे मात्र प्रेक्षकांच्या प्रतीक्षेत आहेत. या असमतोलावर तोडगा काढण्यासाठी पुणे महानगरपालिका प्रशासनाने उपनगरांमध्ये सांस्कृतिक उपक्रम वाढविण्याचा निर्णय घेतला असून, व्यापक सांस्कृतिक धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
सध्या बालगंधर्व रंगमंदिर, गणेश कला क्रीडा मंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आणि विठ्ठलराव तुपे नाट्यगृह येथे नियमित कार्यक्रम होत असून आयोजक आणि प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. मात्र इतर नाट्यगृहांना अपेक्षित प्रमाणात प्रयोग मिळत नसल्याने उत्पन्नातही तफावत दिसून येत आहे. प्रशासनाच्या मते, सांस्कृतिक उपक्रमांचे विकेंद्रीकरण केल्यास उपनगरांतील रंगमंचांनाही चालना मिळू शकते.
यासाठी ‘उपनगरातील नाट्यगृहात चार कार्यक्रम आयोजित केल्यास प्रतिसाद असलेल्या नाट्यगृहात एका कार्यक्रमाची तारीख देणे’ अशी विशेष योजना प्रस्तावित आहे. या माध्यमातून कलाकार, निर्माते आणि सांस्कृतिक संस्थांना उपनगरांकडे वळविण्याचा प्रयत्न होणार आहे. यासंदर्भात सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिनिधींशी चर्चा सुरू असून लवकरच अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. विशेषतः पंडित भीमसेन जोशी कलादालन येथे सर्वात कमी प्रतिसाद मिळत असल्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे.
दरम्यान, नाट्यगृहांतील स्वच्छतागृहांच्या स्थितीबाबत वाढत्या तक्रारींचाही गांभीर्याने विचार केला जात आहे. चित्रपटगृहांच्या धर्तीवर स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पुढील दोन-तीन महिन्यांत काम सुरू होणार आहे. डासांची समस्या आणि परिसर स्वच्छतेवरही विशेष भर दिला जाणार आहे. प्रेक्षकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्यास उपनगरांतील नाट्यगृहांमध्येही गर्दी वाढेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
यंदा दोन नवीन नाट्यगृहे सुरू होणार असल्याने सांस्कृतिक पायाभूत सुविधांमध्ये आणखी भर पडणार आहे. कोथरूड येथे ४५० आसनक्षमतेचे बाळासाहेब ठाकरे बालनाट्यगृह आणि सिंहगड रोड परिसरात ८०० आसनक्षमतेचे छत्रपती शिवाजीराजे भोसले कलामंदिर सुरू होणार आहे. विशेषतः सिंहगड रोड परिसरात सध्या स्वतंत्र नाट्यगृह नसल्याने नव्या कलामंदिराला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे.
१ एप्रिल २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत मिळालेल्या उत्पन्नाच्या आकडेवारीनुसार मध्यवर्ती नाट्यगृहांचे उत्पन्न लक्षणीय असून उपनगरांतील रंगमंदिरांच्या तुलनेत मोठी तफावत दिसून येते. त्यामुळे आर्थिक शाश्वततेसाठी आणि सांस्कृतिक समतोल राखण्यासाठी नव्या धोरणाची गरज अधोरेखित झाली आहे. आगामी सांस्कृतिक धोरणामुळे पुण्यातील सर्व भागांमध्ये समान प्रमाणात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित होतील आणि ‘सांस्कृतिक राजधानी’ ही ओळख अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information