महाराष्ट्रात ई-कॅबिनेट: मंत्रिमंडळ आता डिजिटल, आयपॅडवरून कारभार; कागदाचा वापर होणार बंद

0
मंत्रिमंडळ आता डिजिटल, आयपॅडवरून कारभार; कागदाचा वापर होणार बंद

मंत्रिमंडळ आता डिजिटल, आयपॅडवरून कारभार; कागदाचा वापर होणार बंद

महाराष्ट्रात आजपासून ई-कॅबिनेट प्रणाली लागू; मंत्र्यांना आयपॅड वाटप, बैठकीचा अजेंडा डिजिटल स्वरूपात मिळणार, गोपनीयता राखण्यावर भर.

सायली मेमाणे

२४ जून २०२५ : मुंबई – महाराष्ट्र मंत्रिमंडळात आजपासून इतिहास घडला असून, राज्यात पहिल्यांदाच ई-कॅबिनेट प्रणालीचा वापर सुरू करण्यात आला आहे. या नव्या प्रणालीअंतर्गत प्रत्येक मंत्र्याला आयपॅड प्रदान करण्यात आले असून, मंत्रिमंडळाच्या बैठका पेपरलेस म्हणजेच पूर्णतः डिजिटल स्वरूपात घेतल्या जाणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी सुरुवातीपासून आग्रही भूमिका घेतली होती आणि अखेर आजपासून त्या संकल्पनेची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

राज्य सरकारने ५० आयपॅड खरेदी करण्यासाठी एकूण १ कोटी १६ लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. यामध्ये आयपॅड, मॅजिक कीबोर्ड, मॅजिक पेन्सिल आणि आयपॅड कव्हर यांचा समावेश आहे. आता मंत्र्यांना बैठकीचे सर्व दस्तऐवज व अजेंडा थेट त्यांच्या आयपॅडवर मिळणार आहे. विशेष म्हणजे, प्रत्येक मंत्र्याला कोड दिला जाणार असून, तो कोड टाकल्याशिवाय संबंधित मंत्री अजेंडा पाहू शकणार नाही. त्यामुळे बैठकीपूर्वीच अजेंडाची माहिती बाहेर जाण्याच्या प्रकाराला रोख बसणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी अजेंडा लीक होण्याच्या घटना गंभीरतेने घेतल्या होत्या आणि गोपनीयता जपण्यावर भर देत हे डिजिटल संक्रमण सुचवले होते. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी या संदर्भात सविस्तर आराखडा तयार करून मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतर अंमलबजावणी सुरू केली. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठका आता कागदविरहित आणि सुरक्षित होणार आहेत, असा सरकारचा दावा आहे.

तथापि, सर्व मंत्री तांत्रिकदृष्ट्या कुशल नाहीत ही बाब यशस्वी अंमलबजावणीसाठी एक अडथळा ठरू शकते. काही मंत्र्यांना स्मार्टफोनही पूर्णतः वापरता येत नाही, त्यामुळे आयपॅड वापरण्यासाठी त्यांना पीए किंवा OSD चा आधार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे गोपनीयतेसाठी तयार केलेली ई-कॅबिनेट प्रणाली प्रत्यक्षात कितपत सुरक्षित राहते, यावर चर्चा सुरू झाली आहे. हा बदल फक्त कॉर्पोरेट स्टाईल स्टेटमेंट राहणार की खरोखरच प्रणालीत शिस्त आणि कार्यक्षमता आणणार, हे पाहावे लागेल.

यापूर्वी देखील सरकारने मंत्र्यांना लॅपटॉप उपलब्ध करून दिले होते. मात्र त्याचा वापर फारसा झाला नाही. त्यामुळे आयपॅडचा वापर होण्यासाठी मंत्र्यांना डिजिटल प्रशिक्षण देणे, त्यांना अ‍ॅपल प्रणालीची सवय करून देणे हे मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांसमोर एक मोठं आव्हान असेल. यशस्वीतेसाठी केवळ साधन वाटप पुरेसे ठरणार नसून त्याच्या प्रभावी वापरासाठी प्रशिक्षित मनुष्यबळही तितकेच गरजेचे आहे.

Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *