आयआयटी बॉम्बे येथे 720 कोटींची क्वांटम फॅब्रिकेशन सुविधा; महाराष्ट्राचे 2030 पर्यंत जागतिक नेतृत्वाचे लक्ष्य

0
आयआयटी बॉम्बे येथे 720 कोटींची क्वांटम फॅब्रिकेशन सुविधा; महाराष्ट्राचे 2030 पर्यंत जागतिक नेतृत्वाचे लक्ष्य

आयआयटी बॉम्बे येथे 720 कोटींची क्वांटम फॅब्रिकेशन सुविधा; महाराष्ट्राचे 2030 पर्यंत जागतिक नेतृत्वाचे लक्ष्य

राष्ट्रीय क्वांटम मिशनला गती; उद्योग-सिद्ध मनुष्यबळ, फुल-स्टॅक हार्डवेअर आणि क्वांटम डायमंड मायक्रोचिप इमेजरवर काम

पुणे १६ एप्रिल २०२६ : मुंबई: जागतिक क्वांटम दिनानिमित्त मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी महाराष्ट्राला 2030 पर्यंत क्वांटम तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक नेतृत्व मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, क्वांटम तंत्रज्ञान हे आता केवळ संकल्पना किंवा सायन्स फिक्शन राहिलेले नसून संगणक, संवाद व्यवस्था, आरोग्य, वित्त आणि राष्ट्रीय सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये क्रांतिकारी बदल घडवणारे वास्तव तंत्रज्ञान बनले आहे.

IIT Bombay येथे 720 कोटी रुपयांची अत्याधुनिक क्वांटम फॅब्रिकेशन सुविधा उभारली जात असून, ही भारतातील पहिली ‘फुल-स्टॅक क्वांटम हार्डवेअर’ प्रणाली ठरणार आहे. या सुविधेमुळे संशोधन, डिझाइन, फॅब्रिकेशन आणि चाचणी या सर्व टप्प्यांची एकात्मिक साखळी एका छताखाली उपलब्ध होणार आहे. परिणामी, देशांतर्गत क्वांटम हार्डवेअर विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2023 मध्ये 6000 कोटी रुपयांच्या National Quantum Mission ची सुरुवात झाली. या राष्ट्रीय उपक्रमामुळे देशाच्या क्वांटम संशोधन आणि अनुप्रयोगांना गती मिळाली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन’ सुरू करत उद्योग-सिद्ध मनुष्यबळ तयार करण्यावर भर दिला आहे.

Tata Consultancy Services आणि IIT Bombay यांच्या सहकार्याने देशातील पहिल्या क्वांटम डायमंड मायक्रोचिप इमेजरवर काम सुरू असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्तरावर काही कंपन्यांनी हजारो किलोमीटर अंतरावर हॅक-प्रूफ क्वांटम कम्युनिकेशनमध्ये यश मिळवले असून, भविष्यात सुरक्षित संप्रेषणासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे, असे शेलार यांनी नमूद केले.

कार्यक्रमाला मुख्य सचिव राजेश अग्रवाल, विभागाचे सचिव विरेंद्र सिंग, आयशर पुणेचे प्रो. उमाकांत रासोल, IBM India चे संचालक अमित सिंघवी, MahaIT चे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

क्वांटमची संकल्पना सोप्या शब्दांत स्पष्ट करताना शेलार यांनी ‘बिट्स’पासून ‘क्युबिट्स’पर्यंत झालेला प्रवास हा तंत्रज्ञानातील मोठा टप्पा असल्याचे सांगितले. परिमाण आणि मापनाच्या उदाहरणातून त्यांनी क्वांटम विचारसरणीची झलक दिली. उद्योग क्षेत्र आणि तरुणांनी या ‘क्वांटम क्रांतीत’ सक्रिय सहभाग नोंदवावा, शासनाकडून आवश्यक पायाभूत सुविधा, प्रोत्साहन आणि सहकार्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

“आपण तंत्रज्ञानावर आरूढ झालो नाही, तर तंत्रज्ञान आपल्यावर आरूढ होईल,” असे म्हणत शेलार यांनी क्वांटम युगात पुढाकार घेण्याची गरज अधोरेखित केली. महाराष्ट्राने संशोधन, उद्योग आणि कौशल्य विकास या तिन्ही आघाड्यांवर वेगाने काम केल्यास 2030 पर्यंत क्वांटम क्षेत्रात जागतिक नेतृत्व मिळवणे शक्य असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/

Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *