Nandurbar News: सातपुड्यातील रस्त्याविना मरणयातना; आजारी तरुणाला झोळीतून २० किमी पायपीट
दुरबारच्या केलापाणी गावात रस्त्याचा अभाव अजूनही कायम.
नंदुरबारच्या केलापाणी गावात रस्त्याचा अभाव अजूनही कायम. आजारी तरुणाला रुग्णालयात पोहोचवण्यासाठी झोळीतून २० किमी प्रवास. शासन कुठे आहे?
सायली मेमाणे
नंदुरबार २८ जून २०२५ : २१ व्या शतकात भारत डिजिटल युगाकडे झेप घेत असताना, महाराष्ट्रातील काही भाग आजही मूलभूत सुविधांपासून कोसों दूर आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील केलापाणी गावातील एक वास्तव हेच दाखवते की, स्वातंत्र्याच्या ७८ वर्षांनंतरही काही भागात रस्ता, आरोग्य सेवा आणि पिण्याच्या पाण्यासारख्या मूलभूत गरजांचा अजूनही तुटवडा आहे. या गावातील ३० वर्षीय रतिलाल परता पाडवी या तरुणाची प्रकृती अचानक बिघडली आणि गावात रस्ता नसल्यामुळे त्याला रुग्णालयात नेण्यासाठी बांबूच्या झोळीतून तब्बल २० किलोमीटरची पायपीट करावी लागली.
केलापाणी हे गाव प्रसिद्ध थंड हवामान असलेल्या तोरणमाळच्या अगदी जवळ असूनही तेथील नागरिकांना रस्त्याचा लाभ झालेला नाही. रतिलालला दूषित पाणी प्यायल्याने पोटदुखीने ग्रस्त व्हावे लागले आणि वेदना असह्य झाल्यावर नातेवाईक आणि गावकरी मिळून त्याला झोळीत बसवून तोरणमाळ आरोग्य केंद्रात पोहोचवले. हा प्रवास अत्यंत धोकादायक आणि कष्टदायक होता.
ही घटना केवळ रस्त्याचा प्रश्नच नाही तर सरकारच्या विविध योजना, आरोग्य सेवा आणि आदिवासी भागातील विकासाच्या दाव्यांची पोलखोल करणारी आहे. नंदुरबार हा आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित असून दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होतो. पण प्रत्यक्षात सातपुड्यातील अनेक गावांमध्ये रस्ते नाहीत, आरोग्य केंद्रे दुरावस्थेत आहेत, आणि वीजही पोहोचलेली नाही. काही गावांमध्ये अजूनही पाचशेहून अधिक पाड्यांवर अंधारच आहे.
आदिवासी बांधव आजही मरण यातना सहन करत आहेत. आरोग्याची एक साधी सेवा मिळवण्यासाठी त्यांना मैलोन् मैल चालावे लागते. आजही त्यांच्या मुलांना शाळेत जायचे असेल, किंवा कोणालाही आजारपणात दवाखान्यात न्यावं लागलं, तर त्यासाठी रस्त्याची नाही तर पायाचीच वाट बघावी लागते. हे वास्तव देशाच्या विकासाच्या दाव्यांना गालबोट लावणारे आहे.
या घटनेमुळे पुन्हा एकदा हा प्रश्न समोर आला आहे — आदिवासी समाज मुख्य प्रवाहात कधी येणार? निवडणुकांदरम्यान आश्वासनं देणारे लोकप्रतिनिधी विकासाचे काम का करत नाहीत? हा झोळीतून रुग्णालय गाठलेला प्रवास केवळ एका तरुणाचा नाही, तर संपूर्ण आदिवासी भागातील व्यवस्थेवरचा आरोप आहे.
सातपुड्यातील दुर्गम भागात रस्ते, आरोग्य केंद्रे आणि पाण्याच्या सुविधा पोहोचवणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नाही तर आपल्या देशाच्या समानतेच्या मूल्यांची सुद्धा एक कसोटी आहे. केलापाणी गावातील ही घटना फक्त एक बातमी नसून, विकासाच्या दिशेने खऱ्या अर्थाने झोळीतून चालत असलेल्या संपूर्ण समाजाचे प्रतिबिंब आहे.