अत्याचारग्रस्त मुलीच्या शिक्षणासाठी मदत; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

0
अत्याचारग्रस्त मुलीच्या शिक्षणासाठी मदत; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

अत्याचारग्रस्त मुलीच्या शिक्षणासाठी मदत; डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

मावळ तालुक्यातील पोक्सो प्रकरणात पीडित मुलीच्या शिक्षणासाठी मदत, महिला कोअर टीमची सूचना आणि प्रशासनाला महत्त्वाच्या निर्देश-डॉ. नीलम गोऱ्हे यांची बैठक.

पुणे १२ मे २०२६ : मावळ तालुक्यातील जवन (पवना धरण परिसर) येथे ऑगस्ट २०२४ मध्ये अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात ५ मे रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषद उपसभापती आणि शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी लोणावळा येथे वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पीडित मुलीच्या शिक्षण, सुरक्षा आणि पुनर्वसनाबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या.

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, पीडित मुलीचे शिक्षण खंडित होऊ नये यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ तिला देण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार मुलीच्या शिक्षणासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पीडितेला बालसंगोपन योजनेचा लाभ देणे, आरोग्य तपासणी, समुपदेशन आणि स्वावलंबनासाठी विशेष उपाययोजना राबवणे यावरही भर देण्यात आला.

या बैठकीला प्रांताधिकारी सुरेंद्र नवले, तहसीलदार विक्रम देशमुख, पोलीस उपअधीक्षक गजानन टोम्पे, पोलीस निरीक्षक दिनेश तायडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया म्हेत्रे, चाईल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर नेहा ठाकूर, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे आदी अधिकारी उपस्थित होते. संबंधित विभागांनी तातडीने समन्वय साधून पीडितेच्या सुरक्षेची आणि समुपदेशनाची व्यवस्था करावी, असे निर्देश देण्यात आले.

पोक्सो प्रकरणात पीडितेच्या सुरक्षेच्या दृष्टीने महिला दक्षता समितीसोबत एक अनौपचारिक महिला कोअर टीम तयार करण्याची सूचना डॉ. गोऱ्हे यांनी केली. या टीममध्ये महिला लोकप्रतिनिधींचा समावेश असेल, ज्यामुळे महिलांवरील अत्याचारांची माहिती तातडीने प्रशासनापर्यंत पोहोचू शकेल. तालुक्यातील सुमारे २५ हजार ‘लाडक्या बहिणींना’ या उपक्रमात सहभागी करून त्यांना स्थानिक पातळीवर सतर्कतेची जबाबदारी देण्याचा प्रस्तावही त्यांनी मांडला.

भरोसा सेल आणि वन स्टॉप क्रायसिस सेंटरच्या माध्यमातून पीडित मुलीची भेट घेऊन तिचे समुपदेशन सुरू करण्यात आले असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली. समुपदेशनासाठी MSW पदवीधर महिलांची नियुक्ती करावी, असे निर्देश देण्यात आले. आरोग्य, शिक्षण आणि मानसिक आधार या तिन्ही स्तरांवर पीडितेला मदत पोहोचवण्यावर प्रशासनाने लक्ष केंद्रित करावे, असेही डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी यापूर्वी विसापूर येथील घटना आणि रस्त्यातून मुलीला उचलून नेण्याच्या प्रकरणाचाही आढावा घेतला. या दोन्ही प्रकरणांमध्ये पोलिसांनी चार्जशीट दाखल केली असून लवकरच न्यायालयीन प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. अशा प्रकरणांत जलदगतीने न्याय मिळावा, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत डॉ. नीलम गोऱ्हे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली असून त्यांना अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. सामाजिक आणि महिला सुरक्षा विषयांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या डॉ. गोऱ्हे यांनी या प्रकरणातही प्रशासनाला संवेदनशीलतेने काम करण्याचे आवाहन केले.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/

Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed