• Mon. Jul 28th, 2025

NewsDotz

मराठी

जुलै २०२५ आता तुमचा दुपारचा डबाही महागला, मुंबई डबेवाल्यांकडून दरवाढ जाहीर; किती मोजावे लागणार?

Jun 30, 2025
आता तुमचा दुपारचा डबाही महागला, मुंबई डबेवाल्यांकडून दरवाढ जाहीरआता तुमचा दुपारचा डबाही महागला, मुंबई डबेवाल्यांकडून दरवाढ जाहीर

मुंबई तील डबेवाल्यांनी डब्याच्या मासिक दरात २०० रुपयांची वाढ जाहीर केली आहे. जुलै २०२५ पासून नवीन दर लागू, जाणून घ्या संपूर्ण तपशील.

सायली मेमाणे

मुंबई 30 जून २०२५ : मुंबईकरांच्या रोजच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली डबेवाल्यांची सेवा आता महागली आहे. दुपारचे गरमागरम जेवण घरून कार्यालयात पोहोचवणाऱ्या या जगप्रसिद्ध सेवेत मासिक दरात २०० रुपयांची वाढ करण्यात आली असून, ही दरवाढ १ जुलै २०२५ पासून लागू झाली आहे. मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनचे अध्यक्ष उल्हास मुके यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, इंधन दरवाढ, महागाई आणि प्रवासातील जोखमीमुळे दरवाढ अनिवार्य झाली आहे.

याआधी, एका डब्याचे पाच किलोमीटर अंतरापर्यंतचे मासिक शुल्क ₹१२०० इतके होते. मात्र, आता ते ₹१४०० वर पोहोचले आहे. पाच किलोमीटरच्या पुढील अंतरासाठी प्रत्येक ग्राहकाला अतिरिक्त ₹३०० ते ₹४०० आकारले जाणार आहेत. ही सेवा भलेही महाग झाली असली, तरी मुंबईच्या सांस्कृतिक आणि व्यावसायिक जीवनात डबेवाल्यांचे स्थान अद्वितीय असल्याने नागरिक या निर्णयाला समजून घेतील, असे चित्र आहे.

मुंबईतील डबेवाले केवळ जेवण पोहोचवणारे कामगार नाहीत, तर एका मजबूत व्यवस्थेचे प्रतिक आहेत. त्यांच्या अचूक वेळेच्या व्यवस्थापनामुळेच ते जगभर कौतुकाचे पात्र ठरले आहेत. १२५ वर्षांची ही परंपरा आजही आधुनिक मुंबईत एक अद्वितीय उदाहरण आहे. डबेवाले दररोज लाखो डबे कोणतीही तांत्रिक साधने न वापरता वेळेवर पोहोचवतात. त्यांच्या सेवा पद्धतीला फोर्ब्सपासून हार्वर्ड बिझनेस स्कूलपर्यंत मान्यता मिळाली आहे.

दरम्यान, ७ जुलै रोजी मुंबईतील डबेसेवा एक दिवसासाठी बंद राहणार आहे. पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी डबेवाल्यांनी एकदिवसीय सुट्टी जाहीर केली आहे. ५ जुलै रोजी काम करून ते रात्री पंढरपूरकडे प्रस्थान करतील. ६ जुलै रोजी (एकादशी) ते पांडुरंगाचे दर्शन घेतील, तर ७ जुलैला (द्वादशी) उपवास करत पंढरपुरातच राहतील. ८ जुलैपासून ते नेहमीप्रमाणे पुन्हा सेवेत हजर राहतील, अशी माहिती डबेवाल्यांचे नेते सुभाष तळेकर यांनी दिली आहे.

महागाईच्या काळात डबेवाल्यांची सेवा ही एक मोठा दिलासा देणारी बाब असते. मात्र, वाढत्या इंधनखर्चासह इतर आर्थिक बाबी लक्षात घेता, दरवाढ ही अपरिहार्य ठरली आहे. डबेवाल्यांनी आजवर वेळेवर सेवा देत आपला विश्वास टिकवून ठेवला आहे, त्यामुळे ही दरवाढ स्वीकारण्यास ग्राहक तयार असतील, अशी आशा आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune