सासवडच्या सोपानदेव मंदिरात अतिरेकी हल्ल्याची रंगीत तालीम पालखी सोहळ्यापूर्वी पोलिसांची हायअलर्ट मॉकड्रील

सासवडच्या सोपानदेव मंदिरात अतिरेकी हल्ल्याची रंगीत तालीम; पालखी सोहळ्यापूर्वी पोलिसांची हायअलर्ट मॉकड्रील
आषाढी वारी आणि पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सासवड पोलिसांनी संत सोपानदेव मंदिरात अतिरेकी घुसखोरी, बॉम्ब शोध आणि बचाव कार्यावर आधारित विशेष मॉकड्रील केली. लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिस, एटीएस, बीडीडीएस आणि क्यूआरटी पथक सहभागी झाले.
पुणे ०६ जून २०२६ : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी सासवड पोलिसांनी संत सोपानदेव मंदिर परिसरात अतिरेकी हल्ला आणि बॉम्बस्फोटाच्या संभाव्य परिस्थितीवर आधारित विशेष मॉकड्रील आयोजित केली. या रंगीत तालीमेत पोलिस, दहशतवादविरोधी पथक, बॉम्ब शोध व नाशक पथक, श्वानपथक आणि क्यूआरटी पथकाने सहभाग घेतला. तब्बल दोन ते अडीच तास चाललेल्या या सरावामुळे काही काळ मंदिर परिसरात थरारक वातावरण निर्माण झाले होते.
सकाळी दहाच्या सुमारास संत सोपानदेव मंदिरात दोन अतिरेकी लपल्याची काल्पनिक माहिती पोलिसांना मिळाल्याचे गृहित धरून संपूर्ण कारवाई करण्यात आली. माहिती मिळताच सासवड पोलिसांनी तातडीने मंदिर परिसराला वेढा घातला. विशेष पोलीस पथक, बॉम्ब शोध पथक, श्वानपथक, एटीएस आणि लष्करी जवान घटनास्थळी दाखल झाले. मंदिरातील सर्व प्रवेशद्वारे बंद करण्यात आली आणि भाविकांना सुरक्षित अंतरावर थांबविण्यात आले.
यानंतर दहशतवादविरोधी पथकाने मंदिर परिसराची सखोल तपासणी सुरू केली. मंदिरातील एका खोलीत लपलेल्या दोन संशयित व्यक्तींना शोधून ताब्यात घेतल्याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही संपूर्ण कारवाई अत्यंत वेगाने आणि समन्वयाने पार पडली.
दरम्यान, डॉग स्कॉडच्या मदतीने मंदिराच्या बाहेरील परिसराची तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान एका कोपऱ्यात ठेवलेली बॉम्बसदृश वस्तू आढळल्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले. त्यानंतर बॉम्ब शोध आणि नाशक पथकाने ती वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवून नियंत्रित स्फोटाद्वारे निकामी केली. अग्निशमन दलाने तात्काळ पाण्याचा मारा करून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली.
सुरुवातीला स्थानिक नागरिकांना ही मॉकड्रील असल्याची कल्पना देण्यात आली नव्हती. त्यामुळे अचानक वाढलेली पोलिसांची धावपळ, मंदिराला घातलेला वेढा आणि सुरक्षा यंत्रणांची हालचाल पाहून काही काळ घबराट निर्माण झाली होती. मात्र नंतर हा सुरक्षा सराव असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नागरिकांनी पोलिसांच्या तयारीचे कौतुक केले.
यंदा 11 जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सासवडमध्ये दाखल होणार असून 13 जुलै रोजी संत सोपानदेव पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. या काळात लाखो वारकरी आणि भाविक सासवडमध्ये येत असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही तडजोड न करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे.
भोर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर आणि पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही मॉकड्रील पार पडली. यामध्ये सहायक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे, श्रीराम पालवे, अर्चना पाटील, सुनील भिसे, एटीएस पथक, बीडीडीएस पथक, क्यूआरटी टीम तसेच सासवड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.
आषाढी वारीसारख्या मोठ्या धार्मिक सोहळ्यांदरम्यान आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्वरित आणि प्रभावी प्रतिसाद देण्यासाठी अशा प्रकारच्या मॉकड्रील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. या सरावातून विविध सुरक्षा यंत्रणांमधील समन्वय आणि सज्जता तपासण्यात आली असून वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन पूर्णपणे तयार असल्याचा संदेश देण्यात आला आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare