गुणरत्न सदावर्ते यांच्या कानाखाली मारणाऱ्याला ₹1 लाखाचे बक्षीस; उबाठा गट कार्यकर्त्याची जाहीर घोषणा

गुणरत्न सदावर्ते यांच्या कानाखाली मारणाऱ्याला ₹1 लाखाचे बक्षीस
हिंदी सक्तीविरोधातील वाद चिघळला; गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरे बंधूंवर सडकून टीका केल्यानंतर शिवसेना (उबाठा गट) कार्यकर्त्याने त्यांना कानाखाली मारणाऱ्याला ₹1 लाखाचे बक्षीस जाहीर केले.
सायली मेमाणे
पुणे १ जुलै २०२५ : मुंबई : राज्य सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयावरून सुरू झालेला वाद आता चिघळलेला दिसत आहे. ठाकरे बंधू – राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी या निर्णयाला जोरदार विरोध दर्शवत ५ जुलै रोजी मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, वकील गुणरत्न सदावर्ते यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे बंधूंवर सडकून टीका केल्यानंतर राजकीय वातावरण आणखी तापले आहे.
सदावर्ते म्हणाले की, “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे स्वत:च्या राजकारणासाठी मास्टरमाईंड बनले आहेत. शालेय शिक्षणातील हिंदी सक्ती ही शैक्षणिक हत्या असून, त्या विरोधात ते विजय उत्सव साजरा करत आहेत. माझ्यामते तो मेळावा विजयाचा नसून तांडवाचा आहे.”
ही वक्तव्ये शिवसेना (उबाठा गट) आणि मनसेच्या कार्यकर्त्यांना अजिबात पटलेली नाहीत. यामुळे, उबाठा गटाचे कार्यकर्ते प्रशांत भिसे यांनी थेट सदावर्ते यांच्या कानाखाली मारणाऱ्याला ₹1 लाख बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. “सदावर्ते हे मराठी माणसाचा अपमान करत आहेत. ते महाराष्ट्राविषयी गरळ ओकत आहेत. त्यामुळे जर कोणी त्यांना कानाखाली मारले, तर मी स्वतः ₹1 लाख रोख रक्कम देईन,” असे भिसे यांनी स्पष्ट केले.
या प्रकारामुळे राजकारणात पुन्हा एकदा व्यक्तिगत हमले, धमक्या आणि तीव्र टीकाटिप्पणीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी सदावर्ते यांच्या घराबाहेर वाहनांची तोडफोड केली होती.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीला विरोध करत एकत्रित मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेतलेला असतानाच, सदावर्ते यांच्या टिप्पणीने आघाडीचा वाद अधिक पेटला आहे. शिवाय, ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येत असल्याच्या चर्चांनाही यामुळे नवे वळण मिळाले आहे.
PMC तसेच पोलिसांनी या प्रकाराकडे गांभीर्याने पाहत कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर पुढील पावले उचलण्याची शक्यता आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter