२० हून अधिक गर्लफ्रेंड्स, १० महिलांशी शारीरिक संबंध; बनावट पोलीस आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
बनावट पोलीस आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
मुझफ्फरनगरमध्ये पोलिसांचा गणवेश घालून महिलांची फसवणूक करणारा ‘बोगस पोलीस’ अटकेत; २० पेक्षा जास्त गर्लफ्रेंड्स, आर्थिक आणि लैंगिक शोषणाचा धक्कादायक प्रकार.
सायली मेमाणे
मुझफ्फरनगर ३ जुलै २०२५ : उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये एका धक्कादायक घटनेत पोलीस बनून महिलांना फसवणारा आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. नौशाद त्यागी उर्फ रिक्की त्यागी असं या आरोपीचं नाव असून, तो गेली तीन वर्षं विविध राज्यांतील महिलांना प्रेमाचे आमिष दाखवून त्यांचं आर्थिक आणि लैंगिक शोषण करत होता.
पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पोलिसांचा गणवेश परिधान करून स्वत:ला पोलीस शिपाई असल्याचं भासवून महिला व युवतींना विश्वासात घेतलं. त्याने दिल्ली, आसाम, मेघालय, गाझियाबाद, बुलंदशहर व मुझफ्फरनगरसह अनेक शहरांत २० पेक्षा अधिक महिलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. त्यातील किमान १० महिलांशी त्याने शारीरिक संबंधही ठेवले.
या प्रकरणाचा उलगडा एका पीडित महिलेच्या तक्रारीनंतर झाला. संबंधित महिलेने कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत सांगितले की, आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून २ लाख ७५ हजार रुपये रोख व ३ लाखांचे दागिने घेतले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली.
अटक केल्यानंतर आरोपीकडून पोलिसांचा बनावट गणवेश, उत्तर प्रदेश पोलीस बॅच, बेल्ट, टोपी, नेमप्लेट, सीटी दोरी आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले. या मोबाईलमध्ये अनेक महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले असून, तो महिलांना ब्लॅकमेल करण्यासाठी या व्हिडिओंचा वापर करत होता, असा संशयही व्यक्त करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे, आरोपीने हा गणवेश आपल्या एका पोलीस मित्राच्या अनुपस्थितीत संभल येथे चोरून घेतला होता. निवडणूक ड्युटीसाठी गेलेल्या मित्राच्या अनुपस्थितीत त्याने गणवेश चोरून स्वतः पोलिस असल्याचा सोंग घेतलं. त्यानंतर त्याचा वापर करून महिलांमध्ये विश्वास निर्माण करत फसवणूक सुरु केली.
या फसवणुकीतील बळी ठरलेल्या महिलांमध्ये काही विधवा, पतीपासून विभक्त राहणाऱ्या महिला, तसेच महिला पोलिसांचाही समावेश आहे. तो नेमकं कोणत्या प्रकारे महिलांना टार्गेट करायचा, त्यांच्यावर प्रेमाचा विश्वास निर्माण करून त्यांचं शोषण करायचा, हे तपासात समोर आलं आहे.
सध्या पोलीस विभाग आरोपीच्या मोबाईलमधून इतर पीडित महिलांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहे. पोलिसांनी महिलांना पुढे येऊन तक्रार करण्याचं आवाहन केलं आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस अधीक्षक संजय कुमार वर्मा यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.