लातूरच्या 75 वर्षीय शेतकऱ्याला न्याय; अंबादास पवार यांना सरकारकडून मदतीची घोषणा
अंबादास पवार यांना सरकारकडून मदतीची घोषणा
लातूरमधील 75 वर्षीय शेतकरी अंबादास पवार यांना सरकारकडून मदतीची घोषणा; कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांचा तातडीचा प्रतिसाद.
सायली मेमाणे
लातूर ३ जुलै २०२५ : लातूर : शेतीच्या मशागतीसाठी बैल वा यंत्र afford करता येत नसल्यामुळे लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील हाडोळती गावात राहणाऱ्या 75 वर्षीय शेतकरी अंबादास पवार यांनी स्वतःच्या खांद्यावर जू घेत शेतीची कोळपणी केली. सरकारला जाग आली असून, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी पवार यांना तातडीची मदत जाहीर केली आहे.
पंचाहत्तरीतील आजोबांना शेतीसाठी मदतीची गरज असताना, त्यांच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अतिशय हालाखीची होती. मुलगा शहरात रोजगाराच्या शोधात, घरात पैसे नाहीत आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर. अशा परिस्थितीतही अंबादास पवारांनी परिस्थितीला शरण न जाता स्वतः जू खांद्यावर घेऊन कोळपणी केली.
राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनात सरकारकडून लक्ष वेधले गेले. विरोधकांनी सरकारवर टीका केली, तर सत्ताधाऱ्यांनी तातडीने मदतीची घोषणा केली. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी त्वरित मदतीचं आश्वासन दिलं, तर सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी स्वतः फोन करून पवार यांच्याशी संवाद साधला.
अंबादास पवार यांनी मंत्रीपदाचा सन्मान करताना फक्त एवढीच विनंती केली की “मानेभोवती पडलेला कर्जाचा फास काढा”. ही भावना आज महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांची आहे.
ही घटना केवळ एका शेतकऱ्याची व्यथा नसून संपूर्ण राज्यातील शेती संकटावर आरसा दाखवणारी आहे. झी 24 तासने हे प्रकरण समोर आणले आणि सरकारने उशिरा का होईना प्रतिसाद दिला, हे आशादायक आहे. मात्र, याच धर्तीवर इतर शेतकऱ्यांनाही तातडीचा दिलासा मिळावा, हीच जनतेची अपेक्षा आहे.
लातूरच्या 75 वर्षीय अंबादास पवार यांच्या शेतात जू खांद्यावर घेतलेला संघर्ष सरकारपुढे पोहोचला; कृषिमंत्र्यांनी दिली तातडीच्या मदतीची घोषणा.