Thane News : मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा संताप; मनसे कार्यकर्त्यांच्या मारहाणीविरोधात निषेध रॅली
मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा संताप; मनसे कार्यकर्त्यांच्या मारहाणीविरोधात निषेध रॅली
मिरारोडमध्ये मराठी बोलण्यास नकार दिल्याने मनसे कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेनंतर मीरा-भाईंदरमधील व्यापाऱ्यांकडून सर्व दुकाने बंद ठेवून निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले.
सायली मेमाणे
पुणे ३ जुलै २०२५ : मीरारोड परिसरात एका हिंदी भाषिक व्यापाऱ्याने मराठी बोलण्यास नकार दिल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी त्याला कानशिलात लगावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना बालाजी हॉटेलजवळ घडली असून मनसेचे उपशहर प्रमुख करण कांडणगिरे यांनी संबंधित व्यापाऱ्यावर हात उगारल्याचे दिसून आले. या घटनेनंतर जोधपूर स्वीट्स अॅण्ड नमकीन या दुकानातील मारहाण झालेल्या व्यापाऱ्याच्या समर्थनार्थ संपूर्ण मीरा भाईंदर व्यापारी समुदाय रस्त्यावर उतरला आहे. व्यापाऱ्यांनी सकाळपासूनच दुकाने बंद ठेवत मिरा रोड पूर्व येथील सेवेन स्कूलपासून पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या कार्यालयापर्यंत निषेध रॅली काढली.
रॅलीदरम्यान “व्यापाऱ्यांच्या सुरक्षेची गॅरंटी कोण घेणार?” आणि “गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही” अशा घोषणा देण्यात आल्या. शेकडो व्यापाऱ्यांनी सहभाग घेतलेली ही रॅली पोलिसांना निवेदन देण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, ही घटना केवळ एक व्यापारापुरती मर्यादित नाही, तर भविष्यात अशा प्रकारची कोणत्याही व्यावसायिकावर पुनरावृत्ती होऊ शकते, ही भीती व्यापाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
पोलिसांनी काही मनसे कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र व्यापाऱ्यांच्या मते केवळ गुन्हा दाखल करून चालणार नाही, तर ठोस कारवाई करावी लागेल. व्यापाऱ्यांच्या संघटनांनी पोलीस प्रशासनाकडून भविष्यातील सुरक्षिततेबाबत खात्री मागितली असून शांतता राखून योग्य कारवाई न झाल्यास पुढील आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे. हा प्रकार संपूर्ण शहरात अस्वस्थता निर्माण करणारा असून व्यवसायिकांमध्ये एकजूट वाढवण्याची गरज अधोरेखित करतो.