वारणेचा 240 मेगावॉट पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्प चंदगडमध्ये; राज्यात सहकारातून पहिलाच प्रयोग

0
वारणेचा 240 मेगावॉट पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्प चंदगडमध्ये

वारणेचा 240 मेगावॉट पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्प चंदगडमध्ये

कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात 240 मेगावॉट क्षमतेचा वारणा समूहाचा पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्रात सहकारातून अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम राबवला जात आहे.

सायली मेमाणे

पुणे ३ जुलै २०२५ : वारणानगर : महाराष्ट्राने ऊर्जा क्षेत्रात उल्लेखनीय वाटचाल करत असताना अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात वारणेचा 240 मेगावॉट क्षमतेचा पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येणार असून, राज्यात सहकारातून अशा प्रकारचा प्रकल्प पहिल्यांदाच साकारला जात आहे. या उपक्रमासाठी जलसंपदा विभाग आणि तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी नवशक्ती निर्माण संस्था मर्यादित यांच्यात विधानभवन, मुंबई येथे सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार डॉ. विनय कोरे आणि मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे उपस्थित होते.

या प्रकल्पाची गुंतवणूक सुमारे 1008 कोटी रुपये असून, तो तिलारी धरणावर आधारित असणार आहे. पंप स्टोरेज तंत्रज्ञानामुळे वीजेची साठवणूक करून आवश्यकतेनुसार वापर करण्याची सुविधा मिळते. त्यामुळे भविष्यातील वीज मागणीनुसार हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. राज्य सरकारने आतापर्यंत अशा 16 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या असून, 65 हजार मेगावॉट क्षमतेच्या प्रकल्पांचे नियोजन सुरू आहे. शासनाचे उद्दिष्ट एकूण क्षमतेला एक लाख मेगावॉटपर्यंत नेण्याचे आहे.

सध्या राज्य सरकार 2035 पर्यंतचा ऊर्जा ट्रान्समिशन कॉरिडॉर उभारण्यासाठी एक लाख कोटींची गुंतवणूक करीत आहे. अशा परिस्थितीत पंप स्टोरेज प्रकल्पाची भूमिका केवळ पूरक नव्हे, तर आवश्यक बनते. महाराष्ट्रातील पश्चिम घाट ही भूगोलिक रचना अशा प्रकारच्या जलविद्युत प्रकल्पांसाठी अत्यंत अनुकूल असून, त्याचा फायदा वारणा समूहाने घेतला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वारणा सहकारी समूहाने ज्या प्रकारे सहकार क्षेत्रात अग्रगण्य भूमिका बजावली, तशाच पद्धतीने ऊर्जा क्षेत्रातही त्यांनी नेतृत्व करून हा प्रकल्प गतीने पूर्ण करावा. सहकार क्षेत्रातून अशा प्रकल्पांना चालना देणं हे राज्यासाठी आदर्श ठरणार असून, यामुळे ऊर्जा स्वावलंबन साधता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed