सासवडमध्ये महिलांचा प्रशासनाविरोधात एल्गार कचऱ्याच्या बादल्या घेऊन नगरपालिकेत धडक, 8 दिवसांचा अल्टिमेटम

0
सासवडमध्ये महिलांचा प्रशासनाविरोधात एल्गार कचऱ्याच्या बादल्या घेऊन नगरपालिकेत धडक, 8 दिवसांचा अल्टिमेटम

सासवडमध्ये महिलांचा प्रशासनाविरोधात एल्गार कचऱ्याच्या बादल्या घेऊन नगरपालिकेत धडक, 8 दिवसांचा अल्टिमेटम

सासवडमधील कचरा, तुंबलेले ड्रेनेज, गढूळ पाणी आणि अपुऱ्या स्ट्रीट लाईटमुळे संतप्त महिलांनी कचऱ्याच्या बादल्या घेऊन नगरपालिकेत आंदोलन केले. आठ दिवसांत समस्या न सोडवल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे 24 ऑगस्ट 2026 : स्वच्छतेच्या बाबतीत विविध स्तरांवर पुरस्कार मिळवत आदर्श निर्माण केलेल्या पुरंदर तालुक्यातील सासवड शहरात आता कचरा, गढूळ पाणी आणि तुंबलेल्या ड्रेनेजच्या समस्यांवरून नागरिकांचा संताप वाढला आहे. नगरपरिषदेच्या कारभाराविरोधात प्रभाग क्रमांक 11 मधील महिलांनी आक्रमक भूमिका घेत थेट कचऱ्याच्या बादल्या घेऊन नगरपालिकेत धडक दिली. प्रशासनाने नागरिकांच्या मूलभूत समस्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी करत महिलांनी जोरदार निषेध नोंदवला.

आंदोलनकर्त्या महिलांच्या म्हणण्यानुसार, परिसरात नियमितपणे कचरा उचलला जात नाही. घंटागाडी वेळेवर येत नसल्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढीग जमा होत आहेत. काही भागांत सहा-सहा दिवस कचरा उचलला जात नसल्याचा आरोप करण्यात आला. साचलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचे महिलांनी सांगितले.

कचऱ्यासोबतच पाणीपुरवठ्याच्या समस्येवरही आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला जाब विचारला. अनेक दिवसांपासून नळाद्वारे गढूळ पाणी येत असल्याची तक्रार महिलांनी केली. नागरिकांच्या दैनंदिन वापरासाठी आणि पिण्यासाठी पुरवण्यात येणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. आरोग्याला धोका निर्माण होण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

तुंबलेल्या ड्रेनेज लाईनचाही मुद्दा आंदोलनात उपस्थित करण्यात आला. योग्य निचरा होत नसल्याने परिसरात अस्वच्छता वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शहरातील ड्रेनेज व्यवस्था सुधारून सांडपाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याची मागणी महिलांनी केली.

प्रभागातील स्ट्रीट लाईटबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली. रस्त्यांवर लावण्यात आलेले छोटे बल्ब पुरेसा प्रकाश देत नसल्यामुळे रात्री नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. याशिवाय कचरा गाडीवरील चालकांच्या कथित अरेरावीबाबतही महिलांनी प्रशासनाकडे तक्रार केली.

कांबळेश्वर मंदिर परिसरातील कचरा डेपो आणि नमो उद्यानात काम करणाऱ्या ठेकेदाराच्या कामगारांच्या वास्तव्याचा मुद्दाही प्रशासनासमोर मांडण्यात आला. नागरिकांच्या तक्रारी वारंवार करूनही अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने अखेर कचऱ्याच्या बादल्या घेऊन नगरपालिकेत येण्याची वेळ आल्याची भावना महिलांनी व्यक्त केली.

या आंदोलनात नगरसेविका हेमलता इनामके, दीपाली जगताप यांच्यासह परिसरातील अनेक महिला सहभागी झाल्या. भाजप शहराध्यक्ष आनंद जगताप, शिवसेना शहराध्यक्ष मिलिंद इनामके आणि इतर स्थानिक पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते.

नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण कार्यालयात उपस्थित नसल्याने नगरपालिकेच्या वतीने ओंकार शिंदे आणि नगरसेवक राजन जगताप यांनी आंदोलनकर्त्या महिलांची भेट घेतली. त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत संबंधित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला आठ दिवसांची मुदत दिली आहे. घंटागाडी दररोज नियमित सुरू करावी, साचलेल्या कचऱ्याची तत्काळ विल्हेवाट लावावी, रस्त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत आणि परिसरात योग्य ड्रेनेज व्यवस्था उभी करावी, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.

आठ दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास नगरपालिकेसमोर आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेविका हेमलता इनामके आणि दीपाली जगताप यांनी दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी उपस्थित केलेल्या कचरा, पाणी, ड्रेनेज आणि रस्त्यांच्या समस्यांवर सासवड नगरपरिषद आता कोणती पावले उचलते, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.

Also Read: Pune’s Latest Information
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/

Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed