पुण्यात पावसाळा सुरु झाला तरीही 1,300 टँकरद्वारे पाणीपुरवठा; ‘समान योजना’ अद्याप अधांतरी
पुण्यात पावसाळ्याच्या सुरुवातीलाही दररोज 1,300 टँकरद्वारे पाणीपुरवठा
पुण्यात पावसाळ्याच्या सुरुवातीलाही दररोज 1,300 टँकरद्वारे पाणीपुरवठा; PMC च्या समान पाणीपुरवठा योजनेचा अपुरा अंमल नागरिकांसाठी डोकेदुखी.
सायली मेमाणे
पुणे ४ जुलै २०२५ : पुणे शहरात पावसाळा सुरु झालेला असतानाही अनेक भागांत दररोज तब्बल 1,300 पाण्याच्या टँकर फेऱ्या होत आहेत. मे-जूनमध्ये समाधानकारक पाऊस होऊनही पुणे महापालिकेचा नियमित पाणीपुरवठा अपुरा ठरत असल्याचे वास्तव पुढे आले आहे. खडकवासला धरण साखळीतील जलसाठा भरपूर असूनही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू असल्याने पालिकेच्या पाणी व्यवस्थापनाच्या अपयशावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
धरण साखळीतील सध्याचा एकूण साठा 15.74 टीएमसी असून, यात खडकवासला (65% भरलेले), पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांमध्ये मुबलक जलसाठा आहे. मात्र, अद्यापही अनेक उपनगरांमध्ये पाण्याची गैरसोय जाणवत असून, PMC ची ‘समान पाणीपुरवठा योजना’ अद्याप अपूर्ण असल्यामुळे हा तुटवडा भरून काढण्यासाठी नागरिक खासगी टँकरवर अवलंबून आहेत.
महापालिका प्रत्येक भागात स्वतः टँकर पाठवत नसल्याने खासगी टँकर चालक व ठेकेदार नागरिकांना जास्त दराने पाणी पुरवत आहेत. परिणामी सोसायट्यांचे मेंटेनन्स खर्च वाढले असून, टँकरसाठी वेगळा खर्च करावा लागत आहे. यामुळे अनेक ठिकाणी बिल्डर व रहिवाशांमध्ये वाद निर्माण होत आहेत. या ‘टँकर माफिया’मुळे नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसतो आहे.
एप्रिल ते जून महिन्यांतील टँकर फेऱ्यांचे आकडे धक्कादायक आहेत: एप्रिलमध्ये 47,836, मेमध्ये 44,763 आणि जूनमध्येही 39,267 टँकर फेऱ्या झाल्या. यात महापालिकेच्या टँकरसोबतच खासगी ठेकेदार व चलन टँकर समाविष्ट आहेत. म्हणजेच, मागणीत काहीशी घट असूनही पाणीपुरवठा यंत्रणेत असमतोल कायम आहे.
महापालिकेच्या ‘समान पाणीपुरवठा योजने’चा उद्देश म्हणजे संपूर्ण शहराला वेळेत आणि सम प्रमाणात पाणी मिळवून देणे. मात्र योजना पूर्ण होण्यात होत असलेला विलंब, नियोजनशून्यता आणि वितरणातील असमतोल यामुळे या योजनेचे उद्दिष्ट अजूनही अपूर्ण राहिले आहे.
विशेष म्हणजे, 2024 मध्ये धरण साठा केवळ 4.35 टीएमसी होता, तर 2025 मध्ये तो चारपट वाढून 15.74 टीएमसी झाला आहे. तरीही पुणेकरांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे, ही परिस्थिती प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करते.
समान पाणीपुरवठा योजना तातडीने पूर्ण न झाल्यास, पावसाळा असूनही नागरिकांना आर्थिक, मानसिक आणि सामाजिक त्रास सहन करावा लागणार आहे. महापालिकेने तातडीने यंत्रणेत सुधारणा करून टँकरांवरील अवलंबन कमी करण्याची गरज आहे.