पुण्यातील 29 वर्षीय भोंदूबाबाकडून भक्तांची फसवणूक; हिडन ॲपद्वारे खाजगी क्षण पाहणे, अश्लील कृत्य आणि आर्थिक फसवणूक उघड.
सायली मेमाणे
पुणे ४ जुलै २०२५ : पुणे शहरात एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले असून, स्वत:ला दिव्यशक्ती असलेला भोंदू बाबा सांगणाऱ्या 29 वर्षीय प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार या व्यक्तीस बावधन पोलिसांनी अटक केली आहे. या व्यक्तीने एका 39 वर्षीय नागरिकाच्या मोबाईलमध्ये हिडन ॲप इन्स्टॉल करून त्याचा वैयक्तिक डेटा नियंत्रित केला आणि त्याचे खासगी जीवन मोबाईल कॅमेऱ्याद्वारे पाहिले. इतकेच नव्हे, तर मृत्यू टाळण्यासाठी प्रेयसी किंवा वेश्या असलेल्या तरुणीशी शारीरिक संबंध ठेवण्याचा सल्ला देत भक्तांना अश्लील वर्तन करायला भाग पाडल्याचेही उघड झाले आहे.
तक्रारीनुसार, आरोपीने आध्यात्मिक उपायांच्या नावाखाली पीडिताला मानसिकदृष्ट्या प्रभावित करून त्याच्यावर व त्याच्या जवळच्या सहकाऱ्यांवर मोबाईल ॲपद्वारे पाळत ठेवली. या हिडन ॲपच्या माध्यमातून मोबाईलचा नेव्हिगेशन व कॅमेरा सक्रिय करून विशिष्ट कोनात ठेवण्यास सांगितले जात असे, ज्यामुळे भोंदू बाबा खाजगी क्षण प्रत्यक्ष पाहू शकत होता. एका भक्ताचा मोबाईल सतत गरम होऊ लागल्याने तो मित्राच्या मदतीने तपासण्यात आला आणि त्यात हे छुपे ॲप आढळून आले, ज्यातून संपूर्ण प्रकाराचा भांडाफोड झाला.
पोलिसांनी सांगितले की, या व्यक्तीविरुद्ध केवळ एका फिर्यादीने तक्रार दाखल केलेली नसून इतर अनेकांनी त्याच्यावर अशाच स्वरूपाच्या फसवणुकीचे आरोप केले आहेत. आरोपीकडून ३ मोबाईल, २ आयपॅड, प्रोव्हेनॉल आणि इतर औषधांचे गोळ्यांचे रिकामे पाकीट, सोलोपोशे 0.5 एमडी गोळ्यांचे अवशेष, सिमकार्ड, आणि पेन ड्राईव्ह जप्त करण्यात आले आहे. पोलिसांना संशय आहे की, या इलेक्ट्रॉनिक गॅझेट्समध्ये अनेक अश्लील व्हिडीओ क्लिप्स असण्याची शक्यता आहे.
सायबर एक्सपर्टच्या मदतीने पोलिसांनी या उपकरणांतील डेटा फॉरेन्सिक तपासासाठी पाठवले असून, डिलिट केलेला डेटा परत मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. आरोपीने वापरत असलेल्या मोबाईल आणि टॅबवरून त्याने कोणत्या व्यक्तींवर पाळत ठेवली, कोणते व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि त्यांचा काय उपयोग केला, याचा शोध पोलिस घेत आहेत.
या प्रकरणामुळे पुणे शहरात भोंदूबाबांच्या अंधश्रद्धा पसरवणाऱ्या मंडळींबाबत जनजागृती आणि पोलिसांनी अशा लोकांविरोधात कठोर कारवाई करण्याची आवश्यकता अधोरेखित झाली आहे. भक्तांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत, त्यांना मानसिक व आर्थिकदृष्ट्या लुबाडण्याचे हे धक्कादायक प्रकरण अधिक खोलात तपासले जात आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter