वर्ल्ड क्लास गुकेश! कमी लेखणं कार्लसनला पडलं महागात, असा धडा शिकवला की पुन्हा एकदा धोबीपछाड
वर्ल्ड क्लास गुकेश!
बुद्धिबळ विश्वविजेता डी गुकेशने ग्रँड चेस टूरमध्ये मॅग्नस कार्लसनचा पराभव करत आणखी एक इतिहास रचला; आत्मविश्वासात जबरदस्त वाढ.
सायली मेमाणे
पुणे ४ जुलै २०२५ : भारतीय बुद्धिबळाचे नवोदित तेज आणि सध्याचा विश्वविजेता डी गुकेश याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की तो केवळ आशा नव्हे तर आघाडीचा शिलेदार आहे. क्रोएशियातील झाग्रेब येथे सुरू असलेल्या ग्रँड चेस टूरच्या सहाव्या फेरीत गुकेशने नॉर्वेच्या माजी विश्वविजेता मॅग्नस कार्लसनला पराभूत करत स्पर्धेवर वर्चस्व गाजवले. या थरारक सामन्यानंतर गुकेशने स्पर्धेत 10 गुणांची आघाडी घेतली आहे. सुपर युनायटेड रॅपिड आणि ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेतील पहिल्या तीन फेऱ्यांत आघाडीवर असलेल्या गुकेशने चौथ्या फेरीत उझबेकिस्तानच्या नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हशी लढत दिली आणि पाचव्या फेरीत अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनाला नमवले.
या दोन सामन्यांमुळे गुकेश आणि कार्लसन यांच्यातील सामना अधिकच उत्सुकतेचा विषय ठरला. विशेष म्हणजे कार्लसनने सामना होण्याआधीच एक वादग्रस्त विधान करून सांगितले होते की तो गुकेशसोबतचा सामना एखाद्या “कमकुवत खेळाडूविरुद्ध” खेळतो तसा खेळेल. मात्र सामन्याच्या निकालानेच त्याला त्याचा प्रत्युत्तर मिळाले. गुकेशने रॅपिड फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट खेळ करत कार्लसनचा पराभव केला आणि पहिल्या तीन सामन्यांपैकी आघाडी घेतली. उर्वरित दोन सामने आता ब्लिट्झ फॉरमॅटमध्ये खेळले जाणार आहेत.
सामन्यानंतर गुकेशने आपला आनंद व्यक्त करत म्हटले की, “कार्लसनला हरवणे नेहमीच खास असते. सुरुवात काहीशी गडबडीत झाली होती, पण नंतर मी संयम राखून चांगला खेळ केला. या विजयामुळे माझा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे.” तर कार्लसनने स्वतःच्या पराभवाची जबाबदारी घेत म्हटले की, “मी संपूर्ण स्पर्धेत खराब कामगिरी केली. वेळेच्या व्यवस्थापनात मी कमी पडलो आणि गुकेशने ती संधी साधली. त्याच्या खेळाचे कौतुक करावे लागेल.”
हे लक्षात घेण्यासारखे आहे की, हा गुकेशचा कार्लसनविरुद्ध सलग दुसरा विजय आहे. याआधीही गेल्या महिन्यात त्याने कार्लसनचा पराभव केला होता. पहिल्या सामन्यात पोलंडच्या डुडाने 59 चालींमध्ये गुकेशला हरवले होते. मात्र त्यानंतर गुकेशने पुनरागमन करत फ्रान्सच्या अलिरेझा फिरोजा आणि भारताच्याच प्रज्ञानंदावर विजय मिळवले. अशा कामगिरीमुळे तो केवळ भारतासाठी नव्हे, तर संपूर्ण बुद्धिबळ विश्वासाठी एक नवा आदर्श ठरत आहे.