मुंबईत महिलेची समुद्रात उडी, पोलीस कॉन्स्टेबल साईनाथ देवडेंनी वाचवले प्राण
मुंबईत महिलेची समुद्रात उडी, पोलीस कॉन्स्टेबल साईनाथ देवडेंनी वाचवले प्राण
बांद्रा बँडस्टँडवर 53 वर्षीय महिलेनं मानसिक तणावामुळे समुद्रात उडी घेतली. पोलीस कॉन्स्टेबल साईनाथ देवडेंनी धाडसी कृती करत जीव धोक्यात घालून महिलेचा जीव वाचवला. तिची प्रकृती आता स्थिर असून उपचार सुरू आहेत.
सायली मेमाणे
मुंबई ४ जुलै २०२५ : मुंबईच्या बांद्रा बँडस्टँड परिसरात बुधवारी सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. 53 वर्षीय महिला वेनेशिया सरिता क्रास्टा यांनी मानसिक तणावाखाली समुद्रात उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र ड्युटीवर असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल साईनाथ देवडेंनी प्रसंगावधान राखत धाडसी निर्णय घेत समुद्रात उडी मारली आणि महिलेचा जीव वाचवला.
महिला गेल्या 20 वर्षांपासून मानसिक आजाराने त्रस्त होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला भास होत होते की कोणी तरी तिचा पाठलाग करत आहे. या भीतीतून तिने समुद्रात उडी घेतली. हे लक्षात येताच साईनाथ देवडे यांनी क्षणाचाही विलंब न करता समुद्रात उडी घेतली आणि महिलेपर्यंत पोहोचून तिला सुखरूप बाहेर काढले.
महिलेची प्रकृती गंभीर होती आणि तिला तातडीने भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांच्या माहितीनुसार तिची प्रकृती आता स्थिर आहे. बांद्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक संजय मराठे यांनी सांगितले की, महिलेच्या कुटुंबीयांनी कोणतीही तक्रार दाखल केली नाही. पोलीस सध्या तिच्यासाठी आवश्यक मानसिक आरोग्य सेवांचा पुरवठा करण्याचा प्रयत्न करत आहेत.
मुंबई पोलिसांनी त्यांच्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाऊंटवर या घटनेची माहिती देत कॉन्स्टेबल साईनाथ देवडेंच्या धाडसाचे कौतुक केले आहे. या घटनेनंतर सामाजिक माध्यमांवर साईनाथ देवडे यांच्या शौर्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
ही घटना केवळ पोलिसांच्या तत्परतेचे प्रतीक नसून, मानसिक आरोग्य जागरूकतेची गरजही अधोरेखित करते. वेळीच हस्तक्षेप झाल्यामुळे एक जीव वाचला. अशा परिस्थितीत पोलिसांचे प्रशिक्षण, संवेदनशीलता आणि तत्परता किती महत्त्वाची असते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.