संत तुकाराम चित्रपटाची रिलीज डेट जाहीर; पुण्यातून प्रमोशनला धडाक्यात सुरुवात
संत तुकाराम चित्रपटाची रिलीज डेट जाहीर; पुण्यातून प्रमोशनला धडाक्यात सुरुवात
आदित्य ओम दिग्दर्शित ‘संत तुकाराम’ चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे. पुण्यातून प्रमोशनला सुरुवात झाली असून सुबोध भावे, शिना चोहन प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
सायली मेमाणे
पुणे ४ जुलै २०२५ : संत तुकाराम चित्रपटाची प्रदर्शित तारीख अखेर जाहीर झाली असून, हा बहुप्रतिक्षित भव्य चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या निमित्ताने निर्मात्यांनी पुण्यातून मोठ्या प्रमाणावर प्रमोशनला सुरुवात केली आहे. आषाढी एकादशीच्या पावन दिवशी ही घोषणा करून या अध्यात्मिक चित्रपटाच्या प्रवासाला एक भावनिक सुरुवात मिळाली आहे.
‘संत तुकाराम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य ओम यांनी केले असून, तो कर्जन फिल्म्स आणि पुरुषोत्तम स्टुडिओज यांच्या सहनिर्मितीत साकारण्यात आला आहे. या चित्रपटात संत तुकाराम महाराज यांच्या जीवनातील दुःख, संघर्ष, भक्ती आणि सामाजिक क्रांतीचा प्रवास प्रभावीपणे उलगडण्यात येणार आहे.
पुण्यातील पत्रकार परिषदेत मुख्य कलाकार सुबोध भावे, शिवा सूर्यवंशी आणि अभिनेत्री शिना चोहन उपस्थित होते. शिना चोहन यांनी याआधी देहू येथील संत तुकाराम मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले होते. याचप्रमाणे, चित्रपटाच्या प्रमोशनची सुरुवात संतांच्या गावी दर्शन घेऊन झाली, हे भावनिक रूपाने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले गेले.
या चित्रपटात सुबोध भावे संत तुकारामांची भूमिका साकारणार असून, त्यांच्या जोडीला संजय मिश्रा, अरुण गोविल, शिशिर शर्मा, हेमंत पांडे, गणेश यादव, गौरी शंकर, ट्विंकल कपूर, रूपाली जाधव आणि DJ अकबर सामी हे प्रतिभावान कलाकार झळकणार आहेत.
चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला असून, त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. टीझरमध्ये तुकाराम महाराजांचे भावनिक व आध्यात्मिक प्रवासाचे दर्शन घडवण्यात आले आहे.
या चित्रपटाला संगीतातील भव्यतेचा स्पर्श देण्यासाठी संगीतकार निखिल कामत, रवि त्रिपाठी आणि वीरल-लावण यांनी संगीत दिले आहे. चित्रपटात अभंग, शास्त्रीय आणि लोकसंगीताचा सुरेख संगम प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे.
‘संत तुकाराम’ ही कलाकृती केवळ महाराष्ट्रातील नाही तर देशभरातील प्रेक्षकांना भावणारी ठरणार आहे. विशेषतः आषाढी एकादशीच्या निमित्ताने घोषित झाल्यामुळे याचा अध्यात्मिक भावार्थ अधिकच गहिरा झाला आहे.
हा चित्रपट १८ जुलै २०२५ रोजी सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून, अध्यात्मिकतेसह सामाजिक जागृतीचा संदेश देणारी ही कलाकृती सर्वांनाच आवडेल, अशी निर्मात्यांची आशा आहे.