ठाकूरवाडीत पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाचं पाऊल; घराघरात आणि सार्वजनिक ठिकाणी सौर दिव्यांचा प्रकाश

0
ठाकूरवाडीत पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाचं पाऊल

ठाकूरवाडीत पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाचं पाऊल

कर्जत तालुक्यातील ठाकूरवाडी गावात चिराग फाउंडेशनच्या पुढाकाराने पर्यावरणपूरक सौर दिव्यांनी गाव उजळलं; ९८ घरांना होम लाइट आणि वॉटर फिल्टर.

सायली मेमाणे

कर्जत ५ जुलै २०२५ : कर्जत तालुक्यातील ठाकूरवाडी गावाने पर्यावरण संवर्धनासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचलत घराघरात आणि सार्वजनिक ठिकाणी सौर दिवे लावून गाव उजळवलं आहे. चिराग रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन मुंबई यांच्या पुढाकाराने, मिंटोक प्रायव्हेट लिमिटेड आणि धवल शहा यांच्या सहकार्याने, स्थानिक जिल्हा परिषद शाळा, प्रत्येक घर आणि सार्वजनिक जागांवर सौर दिवे बसवण्यात आले. यामुळे या दुर्गम भागातील गावात प्रकाशाचा झगमगाट निर्माण झाला असून, पर्यावरणपूरक जीवनशैलीचा आदर्श निर्माण झाला आहे.

स्टेशन ठाकूरवाडी गावात आयोजित उद्घाटन सोहळ्यात मिंटोकचे संस्थापक रमा ताडेपल्ली आणि खुशाल तलरेजा यांच्या हस्ते सौर पॅनल्स, एलईडी टीव्ही, क्रीडा साहित्य आणि वाचनालयासाठी पुस्तके देण्यात आली. या उपक्रमांतर्गत मिंटोकच्या माध्यमातून ४५ घरांना होम लाइट देण्यात आले, बी एल आर लॉजिस्टिक लिमिटेडने १५ घरांना लाईट आणि वॉटर फिल्टर पुरवले, तर धवल शहा यांनी ३१ घरांना होम लाइट वाटप केली. याव्यतिरिक्त ७६ वॉटर फिल्टर आणि सहा स्ट्रीट लाइट बसवण्यात आले. एकूण मिळून ९८ घरांना सौर होम लाइट आणि वॉटर फिल्टरचा लाभ झाला.

या कार्यक्रमाला चिराग फाउंडेशनच्या संस्थापक संचालक प्रतिभा पाई, ऑपरेशन हेड वृषाली पालवणकर, कम्युनिकेशन मॅनेजर तृप्ती भोसले, फिल्ड सुपरवायझर निखिल सिंह बागल, खांडपे केंद्राच्या प्रमुख उज्ज्वला मोरे, स्थानिक मुख्याध्यापक, शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थ आणि माजी सरपंच किसन कवटे यांनी सांगितलं की, पावसाळ्यात पंधरा पंधरा दिवस अंधार असायचा, त्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि साप-विंचूंमुळे जीवित हानी होण्याचे प्रकार घडायचे. पण आता या सौर दिव्यांमुळे वाडी उजळली आहे आणि सुरक्षिततेचं वातावरण निर्माण झालं आहे.

या उपक्रमामुळे केवळ वीजेची सोय झाली नाही, तर पर्यावरण संवर्धनास चालना मिळाली असून स्थानिक लोकांचा जीवनमान उंचावला आहे. ऊर्जा स्वावलंबन, स्वच्छ पिण्याचं पाणी आणि शैक्षणिक साधनांची उपलब्धता यामुळे ग्रामविकासाला नवी दिशा मिळाली आहे. ठाकूरवाडीचा हा प्रयोग अन्य गावांसाठीही प्रेरणादायी ठरू शकतो.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed