नंदुरबार अंधश्रद्धेच्या नावाखाली 72 वर्षांच्या महिलेची मानसिक छळवणूक, विष प्राशन करून घेतला जीव
अंधश्रद्धेच्या नावाखाली 72 वर्षांच्या महिलेची मानसिक छळवणूक
नंदुरबार जिल्ह्यातील सिंदुरी गावात अंधश्रद्धेमुळे 72 वर्षीय महिलेला ‘डाकीण’ म्हणून हिणवलं. सततच्या छळाला कंटाळून वृद्धेने विष घेतलं. वाचा सविस्तर.
सायली मेमाणे
नंदुरबार ७ जुलै २०२५ : Nandurbar News : अक्कलकुवा तालुक्यातील सिंदुरी गावात एका धक्कादायक घटनेत अंधश्रद्धेच्या नावाखाली ७२ वर्षीय मासलीबाई वळवी या वृद्ध महिलेने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली आहे. मासलीबाई या गावातील काही लोकांच्या आरोपांमुळे मानसिक त्रासात होत्या. त्यांनी वृद्ध महिलेवर “डाकीण” असल्याचा संशय घेतला होता आणि तिच्यामुळेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाल्याचे ठपके लावले होते. या सततच्या हेटाळणीमुळे मासलीबाईंच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचली आणि त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.
ही घटना सिंदुरी (पुजारापाडा) या गावात घडली. मृत महिलेचा मुलगा दीपक वळवी याने मोलगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार भीमसिंग कागड्या वळवी व इतर एका व्यक्तीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 108 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक सागर गाडीलोहार करत आहेत.
सातपुडा भागात अशा प्रकारच्या अंधश्रद्धा आधारित घटना अजूनही वारंवार घडतात. विशेषतः वृद्ध महिलांना डाकीण म्हणून हिणवणं, सामाजिक बहिष्कार घालणं, मानसिक छळ करणं ही गंभीर बाब आहे. अशी बरीच प्रकरणं पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचत नाहीत, त्यामुळे तक्रार नोंदवल्या न जाताच अनेक पीडित अन्याय सहन करत राहतात. या पार्श्वभूमीवर अंधश्रद्धा निर्मूलनासाठी स्थानिक प्रशासन, सामाजिक संस्था आणि गावकऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
ही घटना समाजातील अंधश्रद्धेच्या खोलवर रूजलेल्या विषारी मुळांची साक्ष आहे. २१व्या शतकातही आजही ग्रामीण भागात महिलांना डाकीण ठरवून मानसिक छळ केल्या जातो ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. सरकार आणि सामाजिक संस्था यांनी अशा प्रकारच्या घटनांना गांभीर्याने घेऊन जनजागृती मोहीम, शालेय आणि ग्रामपंचायती पातळीवर शिक्षण व चर्चासत्रांचे आयोजन करणे काळाची गरज आहे.