Nitin Gadkari Warning: “कधीही तिसरं महायुद्ध सुरू होऊ शकते” – गरिबी, संपत्तीच्या केंद्रीकरणावर तीव्र प्रतिक्रिया

0
“कधीही तिसरं महायुद्ध सुरू होऊ शकते” – गरिबी, संपत्तीच्या केंद्रीकरणावर तीव्र प्रतिक्रिया

“कधीही तिसरं महायुद्ध सुरू होऊ शकते” – गरिबी, संपत्तीच्या केंद्रीकरणावर तीव्र प्रतिक्रिया

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात दिला इशारा – जगात सुसंवाद आणि सौहार्द कमी होत असून, वाढत्या गरिबीमुळे कधीही तिसरं महायुद्ध सुरू होऊ शकतं. जाणून घ्या त्यांच्या वक्तव्यामागचं कारण आणि भारताच्या आर्थिक असमतोलाविषयीचे विचार.

सायली मेमाणे

पुणे ७ जुलै २०२५ : Nitin Gadkari News: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जागतिक स्तरावर निर्माण होत असलेल्या असमतोल परिस्थितीवर भाष्य करत तिसऱ्या महायुद्धाचा संभाव्य धोका अधोरेखित केला आहे. नागपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी गरिबी, संपत्तीचं केंद्रीकरण, ग्रामीण भागाचा विकास आणि जागतिक तणाव यावर स्पष्टपणे आपली भूमिका मांडली. गडकरी म्हणाले की, जगभरात संवाद, प्रेम आणि सौहार्द कमी होत असून अशा पार्श्वभूमीवर कधीही तिसरं महायुद्ध सुरू होऊ शकतं. हे युद्ध त्याचं पोट रिकामं असलेल्या माणसाकडून सुरू होईल, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं.

गडकरींच्या या वक्तव्याने केवळ आंतरराष्ट्रीय संबंधच नव्हे, तर देशातील अंतर्गत आर्थिक असमतोलाकडेही लक्ष वेधले आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, देशात गरिबी वाढत असून संपत्ती काही मोजक्या श्रीमंत लोकांमध्येच केंद्रीत होत आहे. या परिस्थितीत बदल घडवून आणण्यासाठी संपत्तीचे विकेंद्रीकरण आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांचा भर ग्रामीण रोजगार निर्मिती आणि गावकऱ्यांच्या कल्याणावर होता. त्यांनी सांगितले की, देशाची आर्थिक रचना अशा प्रकारे विकसित केली पाहिजे की जी फक्त शहरांमध्येच नव्हे, तर गावाकडेही विकास घेऊन जाईल.

गडकरी यांनी आर्थिक धोरणांच्या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव आणि मनमोहन सिंग यांच्या उदारमतवादी आर्थिक धोरणांचे कौतुक केले. मात्र, अनियंत्रित केंद्रीकरणाच्या धोरणांचा त्यांनी विरोध केला. त्यांनी GDP च्या आकडेवारीचा हवाला देत म्हटलं की, सेवा क्षेत्राचा GDP मधील वाटा ५२ ते ५४ टक्के आहे, उत्पादन क्षेत्राचा वाटा २२ ते २४ टक्के आहे, पण ६५-७० टक्के ग्रामीण लोकसंख्येवर अवलंबून असलेल्या कृषी क्षेत्राचा GDP मध्ये केवळ १२ टक्के वाटा आहे, जो अत्यंत असमतोल आहे.

स्वामी विवेकानंदांचा संदर्भ देत गडकरी म्हणाले की, “ज्याचं पोट रिकामं आहे, त्याला तत्वज्ञान शिकवता येत नाही”. या विधानातून त्यांनी सामाजिक व आर्थिक न्यायाची गरज अधोरेखित केली. गडकरी म्हणाले की, त्यांच्याकडे निधी कमी नाही, तर काम कमी आहे. रस्ते विकासासाठी BOT (बिल्ड-ऑपरेट-ट्रान्सफर) पद्धत त्यांनी सुरू केली असून टोलमधून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे आगामी वर्षांत उत्पन्न १.४० लाख कोटींपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यांनी सांगितले की पुढील १५ वर्षांसाठी जर या महसुलाचे चलनीकरण झाले तर सरकारला १२ लाख कोटी रुपये उत्पन्न मिळू शकते.

शेवटी त्यांनी जागतिक स्तरावर उद्भवणाऱ्या तणावपूर्ण वातावरणाबद्दलही चिंता व्यक्त केली. महासत्तांच्या हुकूमशाही वृत्तीमुळे जगात सौहार्द संपत चालल्याचे ते म्हणाले. ही परिस्थिती थांबवण्यासाठी जागतिक पातळीवर चर्चा व उपाययोजना गरजेच्या असल्याचंही त्यांनी ठामपणे मांडलं.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *