Maharashtra Assembly Session 2025: झिरवळांनी आमदाराला ‘मंत्री’ संबोधल्याने गोंधळ, सभागृहात हास्याची लाट
झिरवळांनी आमदाराला 'मंत्री' संबोधल्याने गोंधळ, सभागृहात हास्याची लाट
महाराष्ट्र विधानसभेत मंत्री नरहरी झिरवळ यांनी गडबडीत आमदाराला ‘मंत्री’ संबोधल्याने हास्याचं वातावरण निर्माण झालं. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या मिश्किल टिप्पणीने सभागृहात रंगत आली.
सायली मेमाणे
मुंबई ७ जुलै २०२५ : महाराष्ट्र विधानसभेच्या २०२५ सत्रात एक गंमतीदार प्रसंग घडला. अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री नरहरी झिरवळ यांनी गडबडीत शिवसेना (शिंदे गट) आमदारास ‘मंत्री’ संबोधलं आणि त्यानंतर सभागृहात हास्याची लाट पसरली. ही घटना प्रश्नोत्तर सत्रादरम्यान घडली, जेव्हा अक्कलकुवा मतदारसंघातील शिवसेना आमदारांनी बाजारात भेसळयुक्त तेल विक्रीच्या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला होता.
या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री नरहरी झिरवळ उभे राहिले, मात्र बोलताना गडबडीत त्यांनी आमदार महोदय म्हणण्याऐवजी “मंत्रिमहोदयांनी प्रश्न विचारला आहे” असं म्हटलं. सभागृहातील सदस्यांनी ही चूक लक्षात आणून दिल्यानंतर झिरवळ यांनी त्वरित दिलगिरी व्यक्त केली. मात्र काही क्षणांनंतर पुन्हा त्यांनी तीच चूक केली, ज्यामुळे सभागृहात थोडासा गोंधळ निर्माण झाला.
यावेळी झिरवळ थोडेसे गोंधळलेले दिसले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मिश्किल टिप्पणी करत वातावरण हलकं केलं. त्यांनी म्हटलं, “त्यांना भूमिकेत यायला थोडा वेळ लागेल,” असा टोमणा मारत सभागृहात हास्याचा एक क्षण निर्माण केला. झिरवळांची चूक आणि अध्यक्षांची कोपरखळी या दोहोंमुळे सभागृहातील वातावरण काही क्षणांसाठी हलकं-फुलकं झालं.
राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या आणि गंभीर चर्चांच्या काळात असे प्रसंग सभागृहात गमतीने घेतले जातात. मंत्री झिरवळ यांचा हा गोंधळ काही क्षणांचा असला तरी यामुळे आमदार आणि मंत्री यांच्या भूमिकेचा विनोदी बाजूने उल्लेख झाला. या प्रसंगामुळे सत्राच्या कामकाजात थोडं हसू आणि सहजता अनुभवायला मिळाली.