Nishikant Dubey On Hindi-Marathi Controversy : “आमच्या पैशांवर तुम्ही जगताय”, भाजप खासदार निशिकांत दुबेंचं ठाकरे गटाला थेट आव्हान!
“आमच्या पैशांवर तुम्ही जगताय”, भाजप खासदार निशिकांत दुबेंचं ठाकरे गटाला थेट आव्हान!
भाजप खासदार निशिकांत दुबें यांनी हिंदी-मराठी वादावर संतप्त प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे गटाला थेट आव्हान दिलं आहे. त्यांच्या ट्वीटमुळे वादाला नवी ठिणगी.
सायली मेमाणे
पुणे ७ जुलै २०२५ : महाराष्ट्रात सध्या मराठी-हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून वाद पेटला असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदीचा वापर करून मराठीचा अपमान करणाऱ्यांना मनसे स्टाईल दणका देण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया देत थेट उद्धव ठाकरे गट आणि मराठी भाषिक नेत्यांना आव्हान दिलं आहे. निशिकांत दुबे यांच्या ट्वीटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “जर मुंबईत हिंदी भाषिकांना मारण्याची हिंमत असेल, तर उर्दू भाषिकांनाही मारून दाखवा.” त्यांनी पुढे म्हटलं की, “आपल्या गल्लीत कुत्राही वाघ होतो. कोण कुत्रा कोण वाघ हे तुम्हीच ठरवा,” असं म्हणत त्यांनी उर्मट भाषेत टीका केली आहे.
या विधानांमुळे हिंदी-विरोधातील आंदोलनाला नव्या राजकीय वळणाची शक्यता आहे. माध्यमांशी बोलताना दुबेंनी आणखी वादग्रस्त वक्तव्य करत म्हटलं, “तुम्ही कोणाच्या पैशावर जगता? महाराष्ट्रात टाटा, बिर्ला, रिलायन्सचे युनिट नाहीत. सगळे उद्योग गुजरातमध्ये आहेत. खाणी झारखंड, ओडिशा, छत्तीसगडमध्ये आहेत. तुम्ही कोणता टॅक्स देताय?” असा सवाल करत महाराष्ट्रातील आर्थिक योगदानावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
दुबेंनी केवळ मराठी भाषिक नेत्यांवरच नाही, तर महाराष्ट्रातील निवडणुकीच्या राजकारणावरही टीका करत म्हटलं की, “महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे वोटबँक पॉलिटिक्स करत आहेत. जर त्यांच्यात हिंमत असेल, तर माहीममधील दर्ग्याजवळ जाऊन उर्दू भाषिकांना चोपून दाखवावं. तेवढं केल्यावर मी त्यांना बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारस मानीन.”
दुबेंच्या या विधानांवर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, अनेकांनी त्यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे. काही नेटिझन्सनी त्यांच्यावर भाषावादी तेढ वाढवण्याचा आरोप केला आहे. तर काहींनी भाजपने अशा आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान, ठाकरे गटाकडून किंवा मनसेकडून अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.