पुण्यात अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा अवघ्या २४ तासांत छडा; आरोपी जेरबंद
अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीचा अवघ्या २४ तासांत शोध
पुण्यात अपहरण झालेल्या १५ वर्षीय मुलीचा २४ तासांत शोध; चंदननगर पोलिसांनी तत्काळ कारवाईत आरोपीला अटक केली.
रिपोर्टर : झोहेब शेख
पुणे ७ जुलै २०२५ – चंदननगर पोलीस स्टेशनच्या पथकाने अपहरण झालेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा अवघ्या २४ तासांत यशस्वी शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणत आरोपीस अटक केली आहे. या कारवाईने पोलिसांनी तत्परतेचे उदाहरण घालून दिले आहे.
गुन्हा क्रमांक २५४/२०२५ भादंवि कलम १३७ (२) अन्वये दाखल तक्रारीनुसार, दिनांक ५ जुलै २०२५ रोजी फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी ‘निर्भया’ (टोपन नाव) राहत्या घरातून बेपत्ता झाली होती. फिर्यादीच्या कायदेशीर ताब्यातून कोणीतरी फूस लावून तिला पळवून नेल्याचे निष्पन्न झाल्यावर पोलीस उपनिरीक्षक किरण नरवडे यांच्याकडे तपास देण्यात आला.
सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास, तसेच गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या सखोल तपासातून आरोपी संजय लक्ष्मण धोत्रे (वय २१ वर्षे, रा. कुबेर वस्ती, वडगाव रोड, केसनंद, ता. हवेली, जि. पुणे) यास ओळखण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ हालचाली करत आरोपी व अपहृत मुलीचा ठावठिकाणा शोधून काढत मुलीची सुखरूप सुटका केली. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी ससून रुग्णालयात करण्यात आली असून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
ही यशस्वी कारवाई मा. पोलीस उप-आयुक्त परिमंडळ ४ श्री. सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली, चंदननगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती सीमा ढाकणे तसेच तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक किरण नरवडे यांच्या प्रयत्नांतून पार पडली.
ही कामगिरी पोलिसांच्या तात्काळ प्रतिसाद व सतर्कतेचे उदाहरण ठरली आहे.