पाकिस्तानमध्ये सिंह म्हशींपेक्षा स्वस्त! जंगलाच्या राजावरून सुरु आहे बेकायदेशीर रॅकेट
जंगलाच्या राजावरून सुरु आहे बेकायदेशीर रॅकेट
पाकिस्तानमध्ये सिंहाची किंमत म्हशीपेक्षा कमी आहे; बेकायदेशीरपणे हजारो सिंह पाळले जात असून घरपोच डिलिव्हरीसह हिंसक प्राण्यांचे बाजार तेजीत. पोलिसांची कारवाई सुरु.
सायली मेमाणे
पुणे ८ जुलै २०२५ : पाकिस्तानमध्ये सध्या जंगलाच्या राजावरून मोठा गोंधळ उडाला आहे. २ जुलै रोजी इस्लामाबादमध्ये एका पाळीव सिंहाने महिला आणि दोन लहान मुलांवर हल्ला केला. या घटनेनंतर स्थानिक पोलिसांनी सिंहाच्या मालकाला अटक केली असून पंजाब प्रांतात मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जात आहे. पंजाब पोलिसांनी बेकायदेशीरपणे पाळलेले १० हून अधिक सिंह जप्त केले आहेत.
लाहोरमध्येही हिंसक प्राण्यांच्या वाढत्या घटनांमुळे सिंह पाळणाऱ्यांवर कठोर नजर ठेवली जात आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानमध्ये सिंह पाळणे ही एक वैभवशाली बाब समजली जाते. कराचीमध्ये ३ हजारहून अधिक लोक सिंह पाळतात. लाहोर, इस्लामाबाद, आणि इतर मोठ्या शहरांमध्ये घरच्या घरी सिंह, वाघ यांसारखे हिंसक प्राणी ठेवले जात आहेत. हे प्राणी घरात पाळण्यासाठी कायदेशीर परवाना आवश्यक असतानाही हजारो सिंह बेकायदेशीरपणे पाळले जात आहेत.
सध्याच्या आकडेवारीनुसार पाकिस्तानमध्ये सुमारे ८ हजार पाळीव सिंह आहेत. सोशल मीडियावर सिंहाच्या पिल्लांची बेधडक विक्री केली जाते. एका सिंहाच्या पिल्लाची किंमत सुमारे २५०० डॉलर्स म्हणजे सुमारे २ लाख रुपये आहे. इतकंच नाही तर दलाल घरपोच सिंहाची डिलिव्हरी देतात. या सर्व व्यवहारात कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न पाळता सिंहाचे व्यापार सुरु आहेत.
पाकिस्तानमध्ये सिंह पाळणे हे संपत्तीचे आणि प्रतिष्ठेचे प्रतीक मानले जाते. विशेष म्हणजे लाहोरच्या प्राणीसंग्रहालयात सिंहाचे पिल्लू दोन वर्षांचे झाले की ते विकले जाते आणि याची किंमत सुमारे दीड लाख रुपये असते. त्याचवेळी एका म्हशीची किंमत तब्बल ३ लाख रुपये असल्याचे बोलले जाते. म्हणजेच पाकिस्तानमध्ये सिंह म्हशींपेक्षा स्वस्त आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर वन्यप्राणी संरक्षण कायदे, जनतेची सुरक्षितता, आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बेकायदेशीर प्राणी व्यापार आणि हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान सरकार आणि प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे.