पुण्यात विवाहितेवर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव; नकार दिल्यावर मारहाण, धर्मगुरू आणि नणंदेवर गुन्हा दाखल
पुण्यात विवाहितेवर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी दबाव
पुण्यात विवाहित महिलेला ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्याचा आरोप; धर्मगुरू आणि नणंदेवर गुन्हा दाखल.
सायली मेमाणे
पुणे १० जुलै २०२५ : पुणे – शहरात एका १९ वर्षीय विवाहित महिलेवर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, तिच्या नणंदेसह एका धर्मगुरूने तिला सतत धर्मांतरासाठी मानसिक व शारीरिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, संबंधित व्यक्तींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, पीडित महिलेला तिच्या नणंदेने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्यासाठी दबाव टाकला. जेव्हा पीडित महिलेने स्पष्टपणे नकार दिला, तेव्हा तिच्यावर शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. यामध्ये फ्रान्सिस नावाच्या धर्मगुरूने महिलेवर “मी बाटलीतून आणलेले पाणी तू प्यायले नाहीस, धर्म स्वीकारला नाहीस, तर तुझ्याविरुद्ध पोलिसात खोटी तक्रार दाखल करीन,” अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
तिच्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, हा दबाव एकदाच नाही, तर सातत्याने सुरु होता. मानसिक त्रासासोबतच शारीरिक छळही केला जात असल्याने अखेर या विवाहितेने पोलिसांची मदत घेण्याचा निर्णय घेतला. यावरून समर्थ पोलीस ठाण्यात नणंद व धर्मगुरू फ्रान्सिस यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ७९, २९९, ३०२, ११५(२), १३१, ३५२, ३५१(२), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकरणाचा गंभीरतेने तपास सुरु आहे. या प्रकारामध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात असून, या घटनेनंतर जबरदस्तीने धर्मांतराच्या घटनांवर पुन्हा एकदा सामाजिक चर्चेची नांदी झाली आहे.
देशात लव्ह जिहाद, धर्मांतर, आणि सांप्रदायिक तणाव या मुद्यांवरून आधीच राजकीय वातावरण तापलेले असताना पुण्यातून समोर आलेला हा प्रकार चिंता वाढवणारा आहे. धर्म स्वातंत्र्याच्या घटनात्मक हक्काच्या पार्श्वभूमीवर अशा जबरदस्तीच्या प्रकरणांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडून व्यक्त केली जात आहे.