मुंबईतील काउंटर बॉय बनला कोट्यवधींचा उद्योजक; “99 Pancakes” चा झपाट्याने झालेला उदय!
विकेश शाह यांनी बेकरीतून सुरुवात करून “99 Pancakes” नावाचा कोट्यवधींचा व्यवसाय उभारला
विकेश शाह यांनी बेकरीतून सुरुवात करून “99 Pancakes” नावाचा कोट्यवधींचा व्यवसाय उभारला; संघर्ष, नवकल्पना आणि मेहनतीची प्रेरणादायी कहाणी.
सायली मेमाणे
पुणे १० जुलै २०२५ : मुंबई – यश मिळवण्यासाठी जन्मसिद्ध संधी नसली तरी जिद्द, मेहनत आणि कल्पकता असेल तर कोणीही यशस्वी उद्योजक बनू शकतो, याचे जिवंत उदाहरण ठरले आहेत विकेश शाह. केवळ 700 रुपयांच्या पगारावर बेकरीत काउंटर बॉय म्हणून काम करणाऱ्या या तरुणाने “99 Pancakes” नावाचा भारतभर पसरलेला लोकप्रिय ब्रँड उभा केला आहे.
विकेश शाह यांचे बालपण संघर्षमय होते. वयाच्या पाचव्या वर्षी वडिलांचा शेअर बाजारातील अपयश त्यांच्या कुटुंबाच्या डोक्यावर आर्थिक संकट घेऊन आला. घरची जबाबदारी आईवर आल्याने विकेश यांनी दहावीपासूनच कामाला सुरुवात केली. चर्चगेटच्या एका बेकरीमध्ये काउंटर बॉय म्हणून काम करताना ते फक्त 700 रुपये कमावत होते. मात्र, हेच त्यांचे व्यावसायिक जीवनाचे पहिले पाऊल ठरले.
आठवड्याच्या कामासोबत शिक्षण सुरू ठेवत त्यांनी केवळ 18 व्या वर्षी बेकरीचे मॅनेजर म्हणून काम केले. यानंतर ट्रॅव्हल कंपन्यांपासून परफ्यूम विक्रीपर्यंत त्यांनी अनेक नोकऱ्या केल्या. 1998 मध्ये नोकरी गेल्यानंतर ते प्रचंड आर्थिक संकटात सापडले. त्या काळात महिनाभर वडापाव खरेदी करण्याइतकेही पैसे नव्हते. मात्र, हार न मानता 1999 मध्ये केवळ 22 व्या वर्षी त्यांनी ‘बेक पॉइंट’ नावाचा B2B डेसर्ट सप्लाय व्यवसाय सुरू केला.
पुढे 2009 मध्ये त्यांनी ‘हॅप्पीनेस डेली’ नावाचं स्वतःचं केक शॉप सुरू केलं. मात्र, खरी संधी त्यांच्या वाट्याला आली ती 2014 च्या एम्स्टर्डॅम दौऱ्यात. तेथील स्ट्रीट स्टाइल पॅनकेकने त्यांना प्रेरणा दिली. 2016 मध्ये नोटबंदीमुळे जुना व्यवसाय अडचणीत आला होता, पण एका युक्रेनियन शेजाऱ्याच्या सल्ल्याने त्यांनी पॅनकेक रिटेल व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
2017 मध्ये केवळ 9 लाखांच्या गुंतवणुकीतून काला घोडा येथे “99 Pancakes” चे पहिले आउटलेट सुरू झाले. सुरुवातीला विक्री फारशी झाली नाही, पण दर्जेदार उत्पादने, सोशल मीडिया मार्केटिंग आणि ग्राहकांचा प्रतिसाद पाहून व्यवसायाला वेग आला.
आज “99 Pancakes” चे 5 राज्यांतील 10 शहरांमध्ये 40 आउटलेट्स आहेत, ज्यापैकी 30 फ्रँचायझी स्वरूपात आहेत. सुमारे 70 कर्मचारी या ब्रँडसाठी काम करतात. कोरोना काळात काहीसा अडथळा आला, मात्र विकेश शाह यांनी पुन्हा उभारी घेतली. आज ते स्वतःच्या स्वप्नातल्या घरात BMW चालवतात आणि तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.
विकेश शाह यांची ही कहाणी केवळ एका ब्रँडच्या यशाची कथा नाही, तर ही आहे जिद्द, आत्मविश्वास आणि मेहनतीने उभा राहिलेल्या यशस्वी संघर्षाची. “जिथे जिद्द आहे, तिथे मार्ग आहे” हे त्यांनी आपल्या जीवनातून सिद्ध केले आहे.