येमेनमध्ये भारतीय नर्सला १६ जुलै रोजी फाशी; निमिषा प्रियाच्या शिक्षेवर अंतिम निर्णय, भारत सरकारकडून हस्तक्षेपाची शक्यता

0
येमेनमध्ये भारतीय नर्सला १६ जुलै रोजी फाशी

येमेनमध्ये भारतीय नर्सला १६ जुलै रोजी फाशी

येेमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रिया हिला १६ जुलै रोजी फाशीची शिक्षा ठरवण्यात आली आहे. ‘ब्लड मनी’ आणि भारत सरकारच्या हस्तक्षेपातून शिक्षा रोखण्याचा प्रयत्न सुरू आहे.

सायली मेमाणे

पुणे १० जुलै २०२५ : येेमेन : येमेनी नागरिकाच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेली भारतीय परिचारिका निमिषा प्रिया हिला येमेन सरकारने मृत्युदंडाची अंतिम शिक्षा जाहीर केली असून, तिची फाशीची तारीख १६ जुलै २०२५ अशी निश्चित करण्यात आली आहे. केरळमधील पलक्कडची रहिवासी असलेल्या निमिषाने २०१७ मध्ये येमेनमध्ये एका स्थानिक नागरिकाची हत्या केल्याचा आरोप होता.

या प्रकरणात येमेनच्या ट्रायल कोर्टाने तिला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने देखील तीच शिक्षा कायम ठेवली होती. आता, येमेनचे अध्यक्ष रशाद अल-अलीमी यांनी तिच्या मृत्युदंडाला अधिकृत मंजुरी दिल्यानंतर, १६ जुलै रोजी शिक्षा अंमलात आणली जाणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते सॅम्युअल जेरोम बास्करन यांनी दिली आहे.

न्यायाच्या अंतिम टप्प्यात आशेचा किरण?

सॅम्युअल बास्करन यांना येमेनमधील तुरुंग प्रशासनाने फोनवरुन कळवले की, सरकारी वकिलांनी मृत्युदंडासाठी अधिकृत पत्र जारी केले आहे. मात्र, त्यांनी स्पष्ट केले की अद्याप पर्याय खुले आहेत आणि भारत सरकार या प्रकरणात हस्तक्षेप करून निमिषाच्या शिक्षेवर परिणाम करू शकते.

ते म्हणाले की, “गेल्या भेटीत मृत व्यक्तीच्या कुटुंबाला आम्ही ‘ब्लड मनी’ अर्थात आर्थिक भरपाईचा प्रस्ताव दिला होता. त्यावर अजून प्रतिसाद आलेला नाही. आज मी पुन्हा चर्चेसाठी येमेनला जात आहे.”

निमिषा प्रियाचं प्रकरण काय आहे?

निमिषा प्रिया ही भारतातून गेलेली नर्स असून ती अनेक वर्षांपासून येमेनमध्ये परिचारिका म्हणून कार्यरत होती. ती येथील तलाल अब्दो मेहदी नावाच्या नागरिकासोबत क्लिनिक चालवत होती. तलालच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून तिने त्याचा खून केल्याचा आरोप होता. खून केल्यानंतर पळून जात असताना तिला अटक करण्यात आली.

न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तिच्या मृत्युदंडाला येमेन सरकारने मान्यता दिली. सध्या तिची आई प्रेमा कुमारी ही येमेनमध्ये असून, ती तलालच्या कुटुंबाशी ‘ब्लड मनी’द्वारे माफी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे.

‘ब्लड मनी’ काय आहे?

इस्लामिक कायद्यानुसार, खून प्रकरणात पीडिताचे कुटुंब आर्थिक भरपाईच्या मोबदल्यात आरोपीला माफ करू शकते. त्याअंतर्गत आरोपीला मृत्युदंड टाळण्याची संधी मिळते. निमिषाची आई आणि भारतातील सामाजिक संस्था याच मार्गाने शिक्षेपासून दिलासा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed