आपत्कालीन परिस्थितीसाठी पुणे जिल्हा प्रशासन सज्ज; दहा सॅटेलाईट फोनची केली व्यवस्था

0
पुणे जिल्हा प्रशासनाकडून सॅटेलाईट फोनच्या माध्यमातून आपत्कालीन व्यवस्थेची तयारी

पुणे जिल्हा प्रशासनाकडून सॅटेलाईट फोनच्या माध्यमातून आपत्कालीन व्यवस्थेची तयारी

पुणे जिल्ह्यातील 10 तहसील कार्यालयांमध्ये सॅटेलाईट फोन सज्ज; आपत्कालीन परिस्थितीत संपर्क राखण्यासाठी प्रशासनाची महत्त्वपूर्ण पावले.

सायली मेमाणे

पुणे १० जुलै २०२५ : :नैसर्गिक आपत्ती किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास जिल्हा प्रशासनाचा इतर यंत्रणांशी संपर्क तुटू नये, यासाठी पुणे जिल्ह्यातील 10 प्रमुख तहसील कार्यालयांमध्ये सॅटेलाईट फोनची व्यवस्था करण्यात आली आहे. हे फोन थेट पृथ्वीभोवती फिरणाऱ्या उपग्रहांशी संवाद साधून कार्य करतात. त्यामुळे सामान्य मोबाइल नेटवर्क अपयशी ठरले तरी हे फोन संपर्क साधू शकतात. मोबाईल टॉवर्सच्या उपलब्धतेवर अवलंबून न राहता, सॅटेलाईट फोन थेट उपग्रह सिग्नलवर काम करतात. त्यामुळे अशा फोनचा वापर अत्यंत दुर्गम किंवा पूरग्रस्त भागात अत्यंत उपयुक्त ठरतो.

पुणे जिल्ह्याच्या जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, मुळशी, वेल्हा, भोर, पुरंदर, बारामती आणि दौड या १० तहसील कार्यालयांमध्ये हे सॅटेलाईट फोन वितरित करण्यात आले आहेत. विशेषतः बारामती आणि दौड हे तालुके पूरप्रवण असल्याने याठिकाणी आपत्ती काळात संपर्क तुटण्याची शक्यता असते. मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसात या भागांतील अनेक गावांचा जिल्हा प्रशासनाशी संपर्क तुटला होता, ही बाब लक्षात घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने सॅटेलाईट फोनचा निर्णय घेतला आहे.

पावसाळ्यात सह्याद्री परिसरात दरड कोसळण्याच्या घटना वाढतात, तसेच जुन्नर ते भोर या पर्यटकप्रिय पट्ट्यात वारीच्या पालखी सोहळ्यासह विविध यात्रा आणि उत्सव भरतात. अशा वेळी आपत्कालीन प्रसंगी मदतकार्याचे समन्वय साधण्यासाठी जिल्हा प्रशासनाला सॅटेलाईट फोन महत्त्वपूर्ण साधन ठरेल. जिल्ह्यातील काही ठिकाणी वारंवार नेटवर्क न येण्याच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे या फोनचा वापर दुर्घटनांच्या वेळी संजीवनी ठरू शकतो.

सॅटेलाईट फोन सामान्य मोबाइल फोनपेक्षा वेगळा आणि अधिक महागडा असतो. यासाठी सरकारची परवानगी लागते. हे फोन सतत नेटवर्क शोधत नसल्याने त्यांची बॅटरी दीर्घकाळ टिकते. सॅटेलाईट फोनवरून मोबाईल आणि लँडलाईन नंबरवर थेट संपर्क साधता येतो. यामुळे आपत्तीच्या क्षणी लगेचच सूचना, मदत किंवा चेतावणी द्यायला हे फोन सक्षम असतात. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अशा फोनचा वापर सुरक्षादृष्ट्या आणि हवामान नियंत्रणाच्या कामकाजासाठी पूर्वीपासूनच सुरू आहे. आता पुणे जिल्ह्यानेही हे तंत्रज्ञान वापरात आणून एक पाऊल पुढे टाकले आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed