जोतिबा मंदिर जोडण्याच्या प्रस्तावाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; राजू शेट्टींची रोखठोक भूमिका

जोतिबा मंदिर जोडण्याच्या प्रस्तावाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; राजू शेट्टींची रोखठोक भूमिका
शक्तिपीठ महामार्गासोबत जोतिबा मंदिर जोडण्याच्या प्रकल्पावर कोल्हापूरातील शेतकऱ्यांचा जोरदार विरोध; राजू शेट्टींचा थेट सवाल – “नवा रस्ता कशासाठी?”
सायली मेमाणे
कोल्हापूर १० जुलै २०२५ : कोल्हापूर जिल्ह्यातील सुपीक शेतजमिनीवरून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासह आता जोतिबा मंदिर जोडण्याच्या नव्या उपशाखेवरही प्रचंड वाद निर्माण झाला आहे. नागपूरपासून गोव्यापर्यंत जाणाऱ्या या महामार्गाला कणेरी मठ ते जोतिबा मंदिर असा सुमारे २८ किलोमीटरचा स्वतंत्र जोडरस्ता प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र, या रस्त्यामुळे पन्हाळा, राधानगरी आणि करवीर तालुक्यांतील हजारो शेतकऱ्यांवर उपजीविकेचे मोठे संकट निर्माण होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
शक्तिपीठ महामार्गाला आधीच कोल्हापूर जिल्ह्यात मोठा विरोध आहे. त्यातच आता या नव्या रस्त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आणि संताप अधिक वाढला आहे. कणेरी, वडगाव, नंदवाळ, बालिंगा, साबळेवाडी या गावे आणि कासारी व भोगावती नद्यांच्या परिसरातून हा रस्ता जाणार असल्याने या भागात महापुराचे धोके अधिक वाढतील, अशी स्पष्ट भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. याच मुद्द्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भूमिका स्पष्ट करत सरकारला प्रश्न विचारला आहे की, “पुणे-बंगळुरू महामार्गावरूनच जोतिबाला पोहोचता येते, मग हा नवा मार्ग कशासाठी?”
या मार्गासाठी शेतजमिनीचा मोठ्या प्रमाणावर बळी जाणार असून भराव टाकून हा मार्ग तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे जमिनी क्षारपड होण्याची, पाणी साचून उभं राहत राहण्याची शक्यता असून, शेतीचे मोठे नुकसान होईल. अनेक भागात उत्पन्नासाठी फक्त शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे या निर्णयामुळे कंबरडे मोडण्याची शक्यता आहे.
यावर संतप्त प्रतिक्रिया देताना स्थानिक शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “हा मार्ग तयार करण्याचा प्रयत्न झाला तर लोकप्रतिनिधींनाच रस्त्यावर फिरू देणार नाही.” यामुळे प्रशासकीय आणि राजकीय पातळीवर याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
या आधीच शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधात गावागावातून आंदोलने सुरू झाली आहेत. शेतकऱ्यांच्या भावना प्रक्षुब्ध झाल्या असताना, अशा नव्या प्रकल्पांची उपशाखा आणणे म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे असल्याचे राजकीय निरीक्षक सांगतात. राजू शेट्टींसारखे नेते थेट भूमिका घेत असून, सत्ताधाऱ्यांना खुल्या आव्हानासमोर आणले आहे.
या पार्श्वभूमीवर आता कोल्हापुरातील सुपीक शेतजमिनीच्या संरक्षणासाठी सुरू झालेल्या आंदोलनाला नवीन चळवळीचं रूप मिळू शकतं. शासनाकडून यासंबंधी निर्णय घेण्याआधी शेतकऱ्यांच्या आवाजाकडे गांभीर्याने लक्ष देणे अत्यावश्यक ठरणार आहे. अन्यथा हा रस्ता केवळ वाहतुकीचा नव्हे, तर शेतकऱ्यांच्या संतापाचा मार्ग ठरू शकतो.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter