पुणे कार्यालयीन जागा बाजारपेठेत ऐतिहासिक वाढ; 2025 मध्ये 10 दशलक्ष चौ. फुटाचा टप्पा गाठणार!
पुणे कार्यालयीन जागा बाजारपेठेत ऐतिहासिक वाढ; 2025 मध्ये 10 दशलक्ष चौ. फुटाचा टप्पा गाठणार!
Cushman & Wakefield च्या अहवालानुसार, 2025 च्या पहिल्या सहामाहीत पुणेने 6.8 एमएसएफ लीझिंग व्यवहारांची नोंद केली असून, वर्षाअखेर 10 एमएसएफचा टप्पा पार होण्याची शक्यता. संपूर्ण माहिती जाणून घ्या.
सायली मेमाणे
पुणे ११ जुलै २०२५ : पुणे: २०२५ हे वर्ष पुण्यातील कार्यालयीन जागा बाजारपेठेसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. कुशमन अँड वेकफिल्डच्या Q2 मार्केटबीट रिपोर्टनुसार, पुणे शहराने २०२५ च्या पहिल्या सहामाहीत तब्बल ६.८ दशलक्ष चौ. फुट इतक्या प्रचंड प्रमाणात भाडेतत्वावर करार (ग्रॉस लीझिंग व्हॉल्युम – GLV) केले असून, हे गेल्या वर्षीच्या तुलनेत ६७% आणि मागील सहामाहीच्या तुलनेत ५४% अधिक आहे. या वेगाने वाढत असलेल्या ट्रेंडमुळे पुणे १० एमएसएफचा टप्पा सहज गाठेल, असा अंदाज आहे.
पुणे सध्या देशातील चार आघाडीच्या कार्यालयीन बाजारपेठांमध्ये स्थान पटकावतो. बेंगळुरु (९.९ एमएसएफ), मुंबई (८.२ एमएसएफ) आणि दिल्ली एनसीआर (७.४ एमएसएफ) नंतर पुण्याचा वाटा १६% इतका आहे. इंजिनीअरिंग, उत्पादन, आयटी-बीपीएम आणि फ्लेक्सिबल वर्कस्पेस क्षेत्रांनी मिळून जवळपास ४.६ एमएसएफ व्यवहार घडवले असून, यामध्ये ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर्सचा (GCC) वाटा २.७ एमएसएफ इतका आहे.
फ्लेक्सिबल वर्कस्पेस क्षेत्रात पुणे बेंगळुरुनंतर दुसऱ्या क्रमांकावर असून, गेल्या तीन वर्षांत सरासरी १.५६ एमएसएफची वार्षिक मागणी राहिली आहे. यामुळे शहरातील GLV मध्ये १९% वाटा हा फ्लेक्स सेक्टरचा आहे.
पुरवठ्याच्या बाजूनेही परिस्थिती आशादायक आहे. २०२५ च्या पहिल्या सहामाहीत सुमारे ८ एमएसएफ नव्या दर्जेदार ए आणि ए+ ग्रेड कार्यालयीन जागांचा पुरवठा झाला आहे. रिकाम्या जागांचे प्रमाण सध्या १२-१३% आहे, जे पूर्वी १०% पेक्षा कमी होते. यामुळे बाजारपेठ आता अधिक समतोल होत असल्याचे दिसते. वर्षाअखेरीस रिकाम्या जागांचे प्रमाण १५-१६% पर्यंत वाढेल असा अंदाज आहे.
कुशमन अॅण्ड वेकफिल्डचे पुण्यातील व्यवस्थापकीय संचालक मोइनुद्दीन पटेल यांनी सांगितले की, “पुणे शहराची व्यावसायिक रिअल इस्टेट क्षेत्रातील मागणी, फ्लेक्स वर्कस्पेसेसची वाढ, दर्जेदार जागांचा पुरवठा आणि जागतिक कंपन्यांची रुजू होण्याची तयारी लक्षात घेता, हे शहर व्यावसायिक जागांबाबत देशात अग्रस्थानी जात आहे.”
या रिपोर्टमुळे स्पष्ट होते की, पुणे कार्यालयीन जागांच्या बाजारात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. उच्च दर्जाच्या जागा, व्यावसायिक मागणी आणि जागतिक स्तरावर वाढणारी ओळख यामुळे २०२५ हे वर्ष पुण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहे.