Raj Thackeray On UNESCO Fort Status: “दर्जा मिळाला असला तरी किल्ल्यांवरील अनधिकृत बांधकामं तात्काळ पाडा”; राज ठाकरेंचं सरकारला ठाम आवाहन
"दर्जा मिळाला असला तरी किल्ल्यांवरील अनधिकृत बांधकामं तात्काळ पाडा"; राज ठाकरेंचं सरकारला ठाम आवाहन
युनेस्कोने महाराष्ट्रातील ११ किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा दिल्यानंतर राज ठाकरे यांनी सरकारला निकष पाळण्याचे आणि अनधिकृत बांधकामं हटवण्याचे आवाहन केले.
सायली मेमाणे
मुंबई १२ july २०२५ : – युनेस्कोने महाराष्ट्रातील ११ ऐतिहासिक किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा (World Heritage Site) दर्जा दिल्याने संपूर्ण राज्यात आनंदाचं वातावरण आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या ऐतिहासिक घडामोडीबद्दल समाधान व्यक्त केलं. मात्र, केवळ आनंद न साजरा करता राज्य सरकारने अधिक जबाबदारीने वागण्याची गरज आहे, असं ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. त्यांनी सरकारला युनेस्कोच्या कडक निकषांची आठवण करून देत अनधिकृत बांधकामं तात्काळ हटवण्याची मागणी केली आहे.
राज ठाकरे म्हणाले की, “युनेस्कोच्या दर्जानंतर निकष पाळले नाहीत, तर युनेस्को हा दर्जा मागे घेऊ शकते. अशा दोन उदाहरणं इतिहासात आहेत – ओमानमधील ‘आवरिक्स अभयारण्य’ आणि जर्मनीतील ‘ड्रेस्डन व्हॅली’. ड्रेस्डन व्हॅलीला २००९ मध्ये दर्जा मिळूनही निकष न पाळल्याने तो काढून घेण्यात आला. त्यामुळे केवळ यशाचा जल्लोष न करता जबाबदारीने पावलं उचलायला हवीत.”
या १२ किल्ल्यांमध्ये महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूमधील १ किल्ला आहे. जिंजी किल्ल्याचा समावेशही यामध्ये करण्यात आला आहे. “हे दाखवून देतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा विचार महाराष्ट्रातून तामिळनाडूपर्यंत पोहोचलेला होता. दोन भिन्न भाषांमधील संस्कृती एकमेकांना जोडणाऱ्या या ठिकाणी आज आपलं वैभव उजळून निघतं आहे,” असंही ठाकरेंनी नमूद केलं.
“आता ही वेळ आहे की गडकिल्ल्यांचं नीट संवर्धन, नूतनीकरण केलं जावं. सरकारला यासाठी आवश्यक निधी युनेस्को आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मिळू शकतो. मात्र, राज्य सरकारनेही यासाठी सक्षम निधी द्यावा, असं आम्ही नेहमी सांगत आलो आहोत. यापूर्वीच्या सर्वच सरकारांनी गडकिल्ल्यांची अत्यंत दयनीय अवस्था करून ठेवली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जा मिळूनही आपण अभिमानाने हे किल्ले दाखवू शकत नव्हतो,” असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
“जात, धर्म, राजकीय विचारसरणी याचा विचार न करता, किल्ल्यांवरील सर्व अनधिकृत बांधकामं तात्काळ पाडा. हे आपल्या इतिहासाचं गौरवस्थान आहे. जर किल्ल्यांचं योग्य जतन, पर्यटनासाठी पायाभूत सुविधा, आणि किनारपट्टीचे व्यवस्थापन केलं, तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था नक्कीच वेगाने विकसित होईल,” असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं.