नाशिकमध्ये तीन दिवसांचे राज्यस्तरीय शिबीर, कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांचे स्पष्ट आदेश; माध्यमांपासून दूर राहण्याचा इशारा, गुप्त रणनीतीवर भर.
सायली मेमाणे
पुणे १४ जुलै २०२४ : राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सज्जतेचा नारळ फोडला आहे. गेल्या आठवड्यात हिंदी सक्तीविरोधी सभेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, पक्षाचा आत्मविश्वास वाढला असून, याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये तीन दिवसांचे राज्यस्तरीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
राज ठाकरे यांनी सर्व कार्यकर्त्यांना आदेश दिला आहे की, सोमवारपासून (१४ जुलै) दोन दिवसांसाठी मुंबईबाहेर कार्यशाळेसाठी जाणे आवश्यक आहे. “कपड्यांची बॅग घेऊन शिवतीर्थावर हजर राहा,” असा थेट संदेश देत त्यांनी कार्यकर्त्यांना गुप्तता राखण्याचा इशाराही दिला आहे.
नाशिकमधील इगतपुरी तालुक्यातील कॅमल रिसॉर्ट येथे होणाऱ्या या शिबिरात पक्षाच्या रणनीती, आगामी निवडणुका, युतीचा निर्णय आणि प्रचार यंत्रणा यावर सखोल चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे या शिबिरात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत संभाव्य युतीबाबत निर्णायक चर्चा होण्याची शक्यता आहे. यामुळे हे शिबीर केवळ प्रशिक्षण नव्हे तर राजकीय दिशा ठरवणारे ठरणार आहे.
या शिबिरासंदर्भात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना माध्यमांपासून लांब राहण्याचे कडक आदेश दिले आहेत. कोणत्याही वृत्तवाहिनी, वृत्तपत्र, वेबसाईट किंवा सोशल मीडियावर स्वतःचे मत, प्रतिक्रिया किंवा व्हिडिओ पोस्ट करू नये, असा इशारा त्यांनी दिला आहे. यामध्ये पक्षाचे अधिकृत प्रवक्ते देखील अपवाद नाहीत – त्यांनाही केवळ राज ठाकरे यांची परवानगी मिळाल्यावरच माध्यमांशी बोलण्याची मुभा आहे.
या बंदिस्त सूचना आणि गुप्ततेने राजकीय वर्तुळात ‘मनसेचे गुप्त मिशन’ सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. मागील वर्षांत नाशिक हे मनसेचे मजबूत बालेकिल्ला म्हणून ओळखले जात असल्याने पुन्हा एकदा या ठिकाणी शिबिराची निवड झाल्याने यामागे ठोस रणनीती असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसोबत युतीबाबतचा अंतिम निर्णय याच शिबिरात घेतला जाण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्येही यासंदर्भात उत्सुकता वाढली आहे. काही राजकीय निरीक्षकांच्या मते, जर मनसे-शिवसेना युती झाली तर ती अनेक महापालिकांमध्ये भाजपला आव्हान देणारी ठरू शकते.
या शिबिरातून पुढे काय ठरणार, राज ठाकरे कोणती दिशा दाखवणार आणि कोणत्या नव्या रणनीतीसह मनसे पुढे जाणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. हे शिबीर केवळ कार्यशाळा नसून, मनसेच्या राजकीय पुनरागमनाचा आराखडा ठरवणारा महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitte