आषाढी वारीसाठी राज्यभरातून पंढरपूरला गेलेल्या ९.७१ लाख भाविकांमुळे एसटी महामंडळाला तब्बल ३५.८७ कोटी रुपयांचे उत्पन्न; मागील वर्षीपेक्षा ६.९६ कोटींची वाढ.
सायली मेमाणे
पुणे १४ जुलै २०२४ : पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी यंदा एसटी महामंडळाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला असून, या कालावधीत ९ लाख ७१ हजार ६८३ भाविकांनी एसटीच्या विशेष सेवा घेतल्या. परिणामी महामंडळाला तब्बल ३५ कोटी ८७ लाख ६१ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, हे उत्पन्न गेल्या वर्षीपेक्षा ६ कोटी ९६ लाख ३ हजार रुपयांनी अधिक आहे.
३ ते १० जुलै दरम्यान एसटीने विशेष नियोजन करत ५ हजार २०० ज्यादा बसेस मार्गावर उतरवल्या होत्या. या बसेसनी एकूण २१ हजार ४९९ फेऱ्या पूर्ण करत लाखो भाविकांना त्यांच्या गावांपासून पंढरपूरपर्यंत सुरक्षितपणे ने-आण केली. या यशस्वी सेवेसाठी एसटीचे चालक व वाहक विशेष कौतुकास पात्र ठरले आहेत.
राज्याचे परिवहनमंत्री रवींद्र वायकर सरनाईक यांनी सांगितले की, “एसटी महामंडळाने यंदा उत्तम नियोजन करून मोठ्या संख्येने भाविकांची वाहतूक यशस्वीरीत्या पार पाडली. त्यातून झालेल्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे. विशेषतः हा आर्थिक आकडा महामंडळासाठी दिलासादायक आहे.”
महामंडळाने यासाठी राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी तयार राहून तातडीने वाढीव बसेस सोडण्याची तयारी केली होती. काही ठिकाणी प्रवासी संख्येत अचानक वाढ झाल्यानंतर तात्काळ बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या. छत्रपती संभाजीनगर विभागाकडून विशेष नियोजन झाले होते. दहा दिवसांच्या कालावधीत फक्त संभाजीनगर येथून दररोज १३५ बसेस पंढरपूरकडे रवाना करण्यात आल्या.
संभाजीनगरमधून निघालेल्या बसेसचे तपशील पुढीलप्रमाणे आहेत: मध्यवर्ती बसस्थानक आगारातून २५, सिडको बसस्थानक येथून ३०, पैठणहून २०, सिल्लोड येथून २०, वैजापूरहून १०, कन्नडहून १०, गंगापूर येथून १० आणि सोयगावहून १० अशा एकूण १३५ बसेस दररोज धावत होत्या.
या उपक्रमामुळे फक्त पंढरपूरच्या भाविकांनाच नव्हे तर एसटी महामंडळालाही आर्थिकदृष्ट्या मोठा फायदा झाला आहे. भाविकांचा प्रतिसाद, कर्मचारी वर्गाची तत्परता आणि प्रशासनाचे नियोजन यामुळे आषाढी वारीतील वाहतूक व्यवस्थापन यशस्वी ठरल्याचे स्पष्टपणे दिसून येते. ही कामगिरी भाविकांच्या सेवेसाठी झटणाऱ्या एसटी महामंडळाच्या प्रयत्नांना दिशा देणारी ठरली आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitte