पुण्यात बांगलादेशी तरुणीवर वेश्या व्यवसायासाठी दबाव; ब्यूटी पार्लरच्या नावाखाली मानव तस्करी उघड
पुण्यात बांगलादेशी तरुणीवर वेश्या व्यवसायासाठी दबाव
ब्यूटी पार्लरमध्ये नोकरी देतो म्हणत बांगलादेशी तरुणीला पुण्यात आणले, बुधवार पेठेत देहविक्रीसाठी जबरदस्तीचा प्रयत्न.
सायली मेमाणे
पुणे १४ जुलै २०२४ : Pune Crime News – पुण्यात मानव तस्करीचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बांगलादेशातून एका तरुणीला ब्यूटी पार्लरमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून पुण्यात आणण्यात आले. मात्र येथे तिच्यावर बुधवार पेठेत वेश्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे मानवी तस्करी व बांगलादेशी मुलींच्या जबरदस्तीने देहविक्री व्यवसायात ढकलल्या जाण्याचा धक्कादायक चेहरा पुन्हा समोर आला आहे.
पीडित तरुणी ही आरोपी तमन्ना शेखच्या ओळखीची होती. तमन्नानेच तिला ब्यूटी पार्लरमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडत ती बेंगळुरूमध्ये रकीब खानकडे पोहोचली. त्यानंतर ती पुण्यात आणण्यात आली. पुण्यात आल्यानंतर तिच्यावर वेश्या व्यवसाय करण्यासाठी दबाव आणण्यात आला. तिने विरोध केल्यावर आरोपी अभिषेक संथेबेन्नूर याने तिला पट्ट्याने मारहाण केली आणि खोलीत बंद करून ठेवले.
या प्रकरणाची माहिती एका सामाजिक संस्थेला मिळताच सहकारनगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या निरीक्षक सुरेखा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली. पोलिसांनी तत्काळ शोध मोहीम राबवत अभिषेक आणि तमन्ना या दोघांना अटक केली आणि पीडितेची सुटका केली. आरोपी रकीब खानविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस तपासात धक्कादायक माहिती पुढे आली असून, या तरुणीला भारतात आणल्यानंतर केवळ १५ दिवसांत तिचे आधार कार्ड बनवण्यात आले होते. ही बाब स्पष्ट करताना पोलिसांनी सांगितले की, ही कृती स्पष्टपणे बनावट कागदपत्रांच्या आधारे ओळख तयार करून तिचा गैरवापर करण्याचा प्रयत्न होता.
या तिघांवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा (PITA), लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO) आणि पारपत्र अधिनियमांतर्गत गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयाने दोघा अटक आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
मानवी तस्करीच्या घटना अलिकडच्या काळात वाढत असल्याचे अनेक उदाहरणांतून स्पष्ट झाले आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातच १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलींना वेश्या व्यवसायात ढकलण्याचे प्रकरण समोर आले होते. ही घटनादेखील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली होती.
या घटनांवरून हे स्पष्ट होते की, परराज्यातून किंवा परदेशातून तरुणी व मुलींची फसवणूक करून त्यांना जबरदस्तीने देहव्यवसायात ढकलण्याचे साखळी स्वरूपाचे नेटवर्क पुण्यात सक्रिय आहे. पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येत असून, या प्रकरणात अजून काही आरोपी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मानवी तस्करी, फसवणूक आणि लैंगिक अत्याचाराच्या विरोधात प्रशासन आणि पोलिस यंत्रणेने अधिक कठोर भूमिका घेतली पाहिजे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांतून व्यक्त केली जात आहे. तसेच नागरिकांनीही अशा घटनांची माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात येत आहे.