• Sun. Jul 27th, 2025

NewsDotz

मराठी

पिंपरी-चिंचवड आयुक्त शेखर सिंह यांची हकालपट्टीची मागणी; भाजपचा जोरदार आरोप

Jul 14, 2025
पिंपरी-चिंचवड आयुक्त शेखर सिंह यांची हकालपट्टीची भाजपकडून मागणीपिंपरी-चिंचवड आयुक्त शेखर सिंह यांची हकालपट्टीची भाजपकडून मागणी

पिंपरी-चिंचवड आयुक्त शेखर सिंह यांच्यावर भाजपकडून प्रशासनातील अपयशांवरून हकालपट्टीची मागणी. पाणीपुरवठा, रस्ते, अतिक्रमण, स्वच्छता, बेकायदेशीर बांधकामांवर निष्क्रियतेचा आरोप.

सायली मेमाणे

पुणे १४ जुलै २०२४ : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आयुक्त शेखर सिंह यांचा प्रशासकीय कार्यकाळ संपुष्टात आल्याने त्यांच्या कार्यकाळातील विविध अपयशांवर आता टीकेची झोड उठली आहे. भारतीय जनता पक्षाने या पार्श्वभूमीवर त्यांच्या तातडीच्या हकालपट्टीची मागणी केली असून, भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी आयुक्तांवर थेट निष्क्रियतेचे आरोप करत महापालिकेतील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

शहरासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या २४ तास पाणीपुरवठा योजनेबाबत गाजावाजा झाला खरा, पण प्रत्यक्षात नागरिकांना आजही कमी दाबाने आणि अनियमित स्वरूपात पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पाण्याच्या समस्येबाबत प्रशासनाने समाधानकारक उपाययोजना केल्या नाहीत. आयुक्तांच्या कार्यकाळात या योजनेची अंमलबजावणी अपयशी ठरली असल्याची टीका करण्यात आली आहे.

दुसरीकडे, निगडी ते पिंपरी मेट्रो प्रकल्पासाठी चालू असलेल्या कामांमुळे मुंबई-पुणे महामार्गावर रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे, वाहतुकीची कुचकामी व्यवस्था आणि त्यामुळे वाढणारे अपघात हे नागरिकांच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्न निर्माण करतात. या बाबतीत संबंधित अधिकाऱ्यांकडून लेखी सूचना दिल्याचे सांगण्यात आले असले तरी प्रत्यक्षात सुधारणा झालेली दिसत नाही.

निगडी सेक्टर २२ मधील ‘जवाहरलाल नेहरू पुनर्वसन प्रकल्प’ न्यायालयीन अडचणीत सापडला असून, पालिकेला या अडचणीवर तोडगा काढता आलेला नाही. त्याचप्रमाणे, PCMC कॉलनीमधील ९ धोकादायक इमारतींमध्ये रहिवासी जीव मुठीत धरून राहतात. जीने, स्लॅब आणि दरवाजे यांची मोडकळीस आलेली अवस्था नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करते, पण आयुक्तांकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

शहरात अतिक्रमण आणि बेकायदेशीर बांधकामांचा सुळसुळाट सुरू असून, काही ठिकाणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडक कारवाई झाल्याचे आरोप लावण्यात आले आहेत. मोशी आणि कुदळवाडी परिसरातील बांधकाम परवाना विभागातील अधिकाऱ्यांवर लाच घेण्याचे गंभीर आरोप झाले असून, या प्रकरणात आयुक्तांनी विलंबाने कारवाई केल्याचा आरोप भाजपने केला आहे.

शहरातील स्वच्छता व्यवस्था ढासळल्याचेही स्पष्टपणे दिसते. नाल्यांची सफाई आणि कचरा व्यवस्थापन ठेकेदारांकडून नीट न केल्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढला आहे. या सर्व क्षेत्रांमध्ये नागरिक त्रस्त झाले असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नाराजी वाढली आहे. शिवाय, महापालिकेच्या शाळा आणि रुग्णालयांचा कारभार खाजगी ठेकेदारांकडून चालवण्याचे धोरणही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या व्यवहारांमध्ये राजकीय हस्तक्षेप असल्याचा आरोप करत भाजपने या निर्णयाचा निषेध केला आहे.

या पार्श्वभूमीवर भाजपचे शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी आयुक्त शेखर सिंह यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली असून, “त्यांच्या निर्णय क्षमतेच्या अभावामुळे संपूर्ण शहराचा विकास ठप्प झाला आहे. अशा प्रशासकाला तातडीने पदावरून हटवले पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली आहे. शेखर सिंह यांचा कार्यकाळ हा अपयशाचा स्पष्ट नमुना असल्याचे ते म्हणाले.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitte

Also Read More About Pune