• Sat. Jul 26th, 2025

NewsDotz

मराठी

पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचा उद्रेक; निकालातील गोंधळावरून गेट तोडत आंदोलक घुसले आत

Jul 14, 2025
पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचा उद्रेकपुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचा उद्रेक

पुणे विद्यापीठात निकालातील घोळावरून विद्यार्थ्यांचा आक्रमक मोर्चा; गेट तोडून मुख्य इमारतीसमोर ठिय्या आंदोलन, कुलगुरूंना भेटीची मागणी.

सायली मेमाणे

पुणे १४ जुलै २०२४ : पुणे विद्यापीठ पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आले आहे. अभियांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळी निकालातील गोंधळाविरोधात जोरदार आंदोलन केले. विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार बंद ठेवण्यात आले असतानाही, आक्रमक विद्यार्थ्यांनी गेट तोडून आत प्रवेश करत मुख्य इमारतीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यांच्या मते, निकालात गंभीर त्रुटी असून, निकाल पुन्हा तपासावा आणि गरज असल्यास परीक्षा पुन्हा घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

प्रश्न उपस्थित करण्यात आलेला प्रमुख मुद्दा म्हणजे ग्रेस मार्क्सचे वितरण. विद्यार्थ्यांनी दाखवले की, एकंदरीत ग्रेस मार्क्सचे प्रमाण 10 टक्क्यांपर्यंत मर्यादित असताना, काही विद्यार्थ्यांना याच्या दुपटीहून अधिक ग्रेस मार्क देण्यात आले. उदाहरणादाखल, 50 मार्कांच्या पेपरमध्ये एका विद्यार्थिनीला 9 मार्क्स असूनदेखील तिला 20 मार्क दर्शविण्यात आले आहेत, म्हणजेच थेट 11 मार्क्सचा वाढ — हे नियमानुसार अशक्य असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

या आंदोलनाला पुण्यातील विविध कॉलेजमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने पाठिंबा देत आहेत. शेकडो विद्यार्थी विद्यापीठात उपस्थित होते. ‘न्याय मिळेपर्यंत हटणार नाही’, ‘पुन्हा परीक्षा घ्या’, अशा घोषणा परिसरात घुमत होत्या. आंदोलक विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना त्वरित भेट देऊन निवेदन स्वीकारण्याची मागणी केली. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना आत प्रवेश नाकारल्यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी गेटच तोडून आत प्रवेश केला.

विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, निकालातील या घोळामुळे अनेक विद्यार्थ्यांचे करिअर धोक्यात येण्याची शक्यता आहे. काही विद्यार्थ्यांनी सांगितले की, त्यांचे 1 किंवा 2 मार्क्स कमी असल्यामुळे ते अनुत्तीर्ण झाले आहेत, तर दुसरीकडे काही जणांना अनुचितपणे वाढीव ग्रेस मार्क देण्यात आले आहेत.

विद्यापीठ प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र, घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी सूचित केले की, कुलगुरूंनी स्वतः खाली येऊन संवाद साधावा आणि चौकशी समिती स्थापन करून निकालाची फेरतपासणी व्हावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र केले जाईल.

हा संघर्ष फक्त मार्कांपुरता सीमित नसून, हा विद्यार्थ्यांच्या विश्वासाचा प्रश्न असल्याचे अनेक आंदोलक म्हणाले. विद्यार्थ्यांना न्याय मिळेल की नाही, आणि विद्यापीठ प्रशासन काय भूमिका घेईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitte

Also Read More About Pune