• Sun. Jul 27th, 2025

NewsDotz

मराठी

सचिन-कोहलीलाही जमलं नाही ते शुभमन गिलने केलं! राहुल द्रविडचा 23 वर्ष जुना विक्रम अखेर मोडला

Jul 14, 2025
सचिन-कोहलीलाही जमलं नाही ते शुभमन गिलने केलं!सचिन-कोहलीलाही जमलं नाही ते शुभमन गिलने केलं!

इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम शुभमन गिलने मोडला; द्रविड, सचिन आणि कोहली यांनाही जमले नव्हते हे काम.

सायली मेमाणे

पुणे १४ जुलै २०२४ : भारतीय कर्णधार शुभमन गिल सध्या कसोटी क्रिकेटमध्ये नवनवे विक्रम प्रस्थापित करत आहे. इंग्लंडविरुद्ध चालू मालिकेत त्याची बॅट जरी तिसऱ्या कसोटीत फारशी चालली नाही, तरी त्याने ऐतिहासिक कामगिरी करत टीम इंडियाच्या इतिहासात आपलं नाव कोरलं आहे. गिलने माजी कर्णधार राहुल द्रविडचा २३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडून इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज बनण्याचा मान पटकावला आहे.

राहुल द्रविडने २००२ साली इंग्लंडविरुद्ध ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत ६०२ धावा केल्या होत्या. त्या वेळी त्याची सरासरी होती १००.३३ आणि सर्वोच्च धावसंख्या होती २१७. विशेष म्हणजे ही कामगिरी त्यावेळी सचिन तेंडुलकर किंवा पुढे विराट कोहली यांनाही पार करता आली नव्हती. पण आता शुभमन गिलने ती मर्यादा ओलांडत एक नव्या युगाची सुरुवात केली आहे.

शुभमन गिलने २०२५ मधील या कसोटी मालिकेत केवळ ३ सामन्यांत ६ डावांत १०१.१६ च्या शानदार सरासरीने ६०७ धावा केल्या आहेत. या दरम्यान, त्याने दोन शतके आणि एक भव्य द्विशतक झळकावले. त्याची सर्वोच्च धावसंख्या होती २६९, जी त्याने एजबॅस्टन कसोटीत पहिल्या डावात साकारली.

लॉर्ड्स कसोटीत मात्र गिलची कामगिरी थोडीशी निराशाजनक ठरली. पहिल्या डावात तो केवळ १६ धावांवर बाद झाला, तर दुसऱ्या डावात त्याला फक्त ६ धावा करता आल्या. तरीदेखील, त्याने आधीच्या दोन सामन्यांतील अव्वल कामगिरीच्या जोरावर इतिहास घडवला.

हा विक्रम केवळ आकड्यांपुरता सीमित नाही, तर भारतीय फलंदाजीच्या सातत्य आणि नव्या नेतृत्वाच्या विश्वासाचा पुरावा आहे. गिलचे हे प्रदर्शन नजीकच्या भविष्यात त्याला एक सर्वोत्तम कसोटी फलंदाज म्हणून ओळख मिळवून देईल, यात शंका नाही.

BCCI नेही गिलच्या या कामगिरीसाठी सोशल मीडियावरून विशेष गौरव व्यक्त केला आहे. चाहत्यांमध्येही गिलच्या या ऐतिहासिक धावसंख्येबद्दल मोठा आनंद व्यक्त होत आहे. आता उर्वरित मालिकेत आणि आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो आणखी काय विक्रम करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitte

Also Read More About Pune