• Wed. Jul 23rd, 2025

NewsDotz

मराठी

शिवसृष्टीमध्ये प्रवेशासाठी ५० रुपयांची सवलत १५ ऑगस्टपर्यंत वाढवली

Jul 15, 2025
पुणे : शिवसृष्टीमध्ये प्रवेशासाठी ५० रुपयांची सवलत १५ ऑगस्टपर्यंत वाढवलीपुणे : शिवसृष्टीमध्ये प्रवेशासाठी ५० रुपयांची सवलत १५ ऑगस्टपर्यंत वाढवली

शिवसृष्टीमध्ये ५० रुपयांत प्रवेशासाठी मिळणारी सवलत आता १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. अभूतपूर्व प्रतिसादानंतर ही घोषणा करण्यात आली.

सायली मेमाणे

पुणे १५ जुलै २०२५ : पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन आणि कार्यावर आधारित ऐतिहासिक प्रकल्प ‘शिवसृष्टी’ला मागील दोन महिन्यांत अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यानंतर प्रवेश शुल्कामध्ये मिळणारी सवलत आता १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत कायम ठेवण्यात आली आहे. महाराज शिवछत्रपती प्रतिष्ठानचे विश्वस्त आणि शिवसृष्टी प्रकल्पाचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

या सवलतीचा लाभ नागरिकांना अधिक व्यापक प्रमाणात मिळावा यासाठी प्रतिष्ठानला अभय भुजादा फाउंडेशनकडून ५१ लाख रुपयांचे उदार देणगी स्वरूपात योगदान प्राप्त झाले होते. याच निधीतून १५ मे ते १५ जुलै २०२५ दरम्यान शिवसृष्टीमध्ये प्रत्येकासाठी फक्त ५० रुपये शुल्क आकारले गेले. या कालावधीत १ लाखांहून अधिक पर्यटकांनी शिवसृष्टीला भेट दिली आणि स्वराज्याच्या स्वप्नाला आकार देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या युगाचा भव्य अनुभव घेतला.

जगदीश कदम यांनी सांगितले की, या दोन महिन्यांत नागरिक, विद्यार्थी, शिवभक्त, इतिहासप्रेमी आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर या प्रकल्पाला प्रतिसाद दिला. त्यामुळेच ही सवलत आणखी एका महिन्याकरिता म्हणजेच १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांनी पुणेकरांसह महाराष्ट्रभरातील नागरिकांना शिवसृष्टीला भेट देण्याचे आवाहन केले.

शिवसृष्टी हा आशियातील सर्वात मोठ्या प्रमाणात साकारण्यात आलेला ऐतिहासिक प्रकल्प मानला जातो. यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणापासून ते स्वराज्य स्थापनेपर्यंतच्या जीवनप्रवासाचे अद्भुत सादरीकरण करण्यात आले आहे. प्रकल्पामध्ये विविध देखावे, डायनामिक मूळ स्वरूपातील पुतळे, ध्वनी-प्रकाशाचे सादरीकरण आणि माहितीपूर्ण गॅलरींचा समावेश आहे, जे शिवभक्त आणि इतिहासप्रेमींना महाराजांच्या जीवनाशी समरस होण्याचा एक अद्वितीय अनुभव देतात.

या उपक्रमातून इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा, विशेषतः तरुण पिढीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची आणि त्यागाची प्रेरणा पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवसृष्टीचे आयोजन हे केवळ पर्यटन किंवा विरंगुळा नसून, ते एक प्रेरणादायी आणि शिक्षणात्मक माध्यम बनले आहे.

ही सवलतीची संधी उपलब्ध असतानाच, पुणेकरांसह राज्यातील नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असा पुनश्च आग्रह आयोजकांकडून करण्यात आला आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune