तळजाई मैदानावर पोलिस भरतीसाठी सराव करणाऱ्या युवक-युवतींवर पैलवानांचा हल्ला आणि विनयभंगाचा आरोप; पोलिस तक्रारीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या.
सायली मेमाणे
पुणे १६ जुलै २०२५ : पुण्यातील सहकारनगर येथील तळजाई टेकडीवरील मैदानावर मंगळवारी सकाळी पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या युवक-युवतींवर काही पैलवानांनी हल्ला केला आणि महिलांच्या विनयभंगाचा आरोपही या गोंधळात करण्यात आला आहे. सकाळी घडलेली ही घटना दिवसभर सोशल मीडियावर व्हायरल झाली. मात्र, सहकारनगर पोलीस स्टेशनने तक्रार न घेतल्याचा आरोप करत सायंकाळी चारच्या सुमारास पीडित युवक-युवतींनी थेट पोलिस आयुक्तालय गाठले आणि तेथे ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
प्राप्त माहितीनुसार, तळजाई टेकडीवर दररोज सकाळी सुमारे १५० ते १७० युवक-युवती पोलीस भरतीसाठी धावण्याचा सराव करतात. मंगळवारी सकाळी सराव सुरू असताना मैदानाच्या मध्यभागी चार पैलवान थांबले होते. भरतीसाठी आलेल्या काही तरुणांनी त्यांना बाजूला होण्यास सांगितले असता पैलवान आक्रमक झाले आणि त्यांनी शिविगाळ करत धक्काबुक्की सुरू केली. यावेळी पोलिस खात्यातील एका पीएसआय पदासाठी सराव करणारा पोलीस अंमलदार भांडण सोडवण्यास आला. मात्र, त्यालाही शिविगाळ व मारहाण करण्यात आली.
घटनेनंतर पैलवानांनी इतर साथीदारांना मैदानावर बोलावले आणि सराव करणाऱ्या युवकांना मारहाण केली. यामध्ये काही युवक जखमी झाले. या गोंधळात काही पैलवानांनी मैदानात असलेल्या तरुणींचा विनयभंग केला व त्यांच्याशी अश्लील छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पोलिस तक्रार दाखल करण्यासाठी युवकांनी सहकारनगर पोलिस ठाणे गाठले, मात्र तक्रार नोंदवून घेतली गेली नाही, असा आरोप संबंधितांनी केला आहे. त्यामुळे सायंकाळी चारच्या सुमारास सर्व युवक-युवती थेट पुणे पोलिस आयुक्त कार्यालय गाठले आणि तिथे ठिय्या आंदोलन सुरू केले. पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली आणि सहकारनगर पोलिस ठाण्याशी संपर्क साधून त्वरित कारवाईचे निर्देश दिले.
रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे पुण्यातील पोलिस भरतीसाठी मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. अशा गंभीर घटनेनंतर पोलिसांकडून झालेली उदासीनता आणि तक्रार नोंदवण्यास झालेला विलंब यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर अटक करावी आणि पीडित युवक-युवतींना न्याय द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter