पुणे कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात 15 हरणांचा मृत्यू; विषाणूजन्य साथीची शक्यता, पोस्टमार्टम आणि जैविक तपासणीसाठी नमुने नामांकित प्रयोगशाळांकडे
सायली मेमाणे
पुणे १६ जुलै २०२५ : पुणे – कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात चार ते पाच दिवसांत तब्बल 15 हरणांचा अचानक मृत्यू झाल्याने वन्यजीव प्रेमींमध्ये आणि प्रशासकीय यंत्रणेमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले, तरी प्राथमिक अंदाजानुसार एखाद्या विषाणूजन्य साथीच्या आजाराची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात तपासणी सुरू असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनही सतर्क झाले आहे.
प्राणीसंग्रहालयातील एकूण 98 चितळ प्रकारातील हरणांपैकी 15 हरणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू होण्यापूर्वी कोणतीही स्पष्ट लक्षणे न दिसल्यामुळे अधिकाऱ्यांनी तातडीने पोस्टमार्टेम करून जैविक नमुने विविध प्रयोगशाळांकडे पाठवले आहेत. यामध्ये नागपूर, बरेली, भोपाळ आणि भुवनेश्वर येथील नामांकित प्रयोगशाळांचा समावेश आहे. या अहवालानंतर मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे.
डॉ. घनश्याम पवार, पशुवैद्यकीय अधिकारी, प्राणी संग्रहालय यांनी सांगितले की, “गेल्या चार ते पाच दिवसात 16 हरणांचा मृत्यू झाला असून कोणतीही पूर्वलक्षणे दिसली नाहीत. त्यामुळे आम्ही अनेक प्रयोगशाळांकडे जैविक नमुने पाठवले आहेत. पुढील तीन-चार दिवसात अहवाल प्राप्त होईल.”
दरम्यान, हरणांचा मृत्यू हा जर विषाणूजन्य साथीमुळे झाला असेल, तर त्याचा इतर प्राण्यांवर आणि मानवावरही परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. संग्रहालयात निर्जंतुकीकरण प्रक्रिया, इतर प्राण्यांच्या आरोग्य तपासण्या आणि नवीन निरीक्षण यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहेत.
या गंभीर घटनेच्या पार्श्वभूमीवर आमदार हेमंत रासने यांनी हा विषय थेट विधानसभेत मांडला. त्यांनी शासनाकडे मागणी केली की, “कात्रज प्राणी संग्रहालयात 15 हरणांचा मृत्यू झाल्याने ही बाब अत्यंत गंभीर आहे. इतर प्राण्यांना या आजाराचा प्रसार होऊ नये यासाठी तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश शासनाने द्यावेत.”
अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला ही माहिती महापालिकेकडून जाहीर न करता लपवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र घटनाक्रमाची माहिती माध्यमांमधून आणि स्थानिक आमदारांच्या लक्षात आल्यानंतरच प्रशासन सक्रीय झाले.
🌿 सध्या काय चालू आहे?
- सर्व प्राण्यांची वैद्यकीय तपासणी सुरू
- मृत हरणांचे पोस्टमार्टेम रिपोर्ट प्रतीक्षेत
- संपूर्ण परिसर निर्जंतुक केला जात आहे
- प्रयोगशाळेचा अहवाल तीन ते चार दिवसांत येण्याची शक्यता
- प्रसार रोखण्यासाठी प्रवेश नियंत्रित
📢 वन्यजीवप्रेमी आणि नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. तसेच, संग्रहालय प्रशासनाने नियमित माहिती जाहीर करावी, अशीही मागणी सामाजिक संस्थांकडून करण्यात येत आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter