• Sat. Jul 19th, 2025

NewsDotz

मराठी

एकनाथ शिंदे : झोपडपट्टीमुक्त मुंबईची दिशा, परवडणाऱ्या घरांसाठी 35 लाख गृहप्रकल्पांची घोषणा

Jul 18, 2025
झोपडपट्टीमुक्त मुंबईची दिशा, परवडणाऱ्या घरांसाठी 35 लाख गृहप्रकल्पांची घोषणाझोपडपट्टीमुक्त मुंबईची दिशा, परवडणाऱ्या घरांसाठी 35 लाख गृहप्रकल्पांची घोषणा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत मुंबईचा कायापालट, धारावी पुनर्विकास, गिरणी कामगारांचे घर, व 35 लाख परवडणाऱ्या घरांचा महत्त्वाकांक्षी आराखडा सादर केला.

सायली मेमाणे

पुणे १८ जुलै २०२५ : मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्र सरकार ठोस पावले उचलत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत बोलताना सांगितले की, झोपडपट्टीमुक्त मुंबई, धारावीचा पुनर्विकास, गिरणी कामगारांचे हक्काचे घर, व ३५ लाख परवडणाऱ्या घरांचे बांधकाम हे सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. शिंदे यांनी नमूद केले की, महायुती सरकारच्या कार्यकाळात मुंबईमध्ये सर्वाधिक पुनर्विकासाची कामे पूर्ण केली जात आहेत. हे काम केवळ गृहनिर्माणपुरते मर्यादित नसून रोजगार, शिक्षण आणि आरोग्य यामध्येही बदल घडवून आणणार आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्प ही देशातील सर्वात मोठी झोपडपट्टी स्मार्ट सिटीमध्ये रूपांतरित करण्याचे ऐतिहासिक पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ७२,००० कुटुंबांचे पुनर्वसन यामार्फत होणार असून, आधुनिक सुविधा, पर्यावरणपूरक बांधकाम आणि शाश्वत जीवनशैलीवर भर दिला जाईल. याशिवाय वरळीतील बीडीडी चाळी, मोतीलाल नगर, कामाठीपुरा, आणि रमाबाई आंबेडकर नगरसारख्या भागातील रखडलेले प्रकल्प गतिमान करण्यात आले आहेत.

गिरणी कामगारांना मुंबईलगत परवडणारी घरे देण्याचे नियोजन असून, यासाठी सात ठिकाणी गृहप्रकल्प राबवले जाणार आहेत. आतापर्यंत १३,१६१ कामगारांना घरे देण्यात आली असून, अधिक गृहसंकुल उभारण्याकरिता नियमांमध्ये आवश्यक बदल केले जातील. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, या सर्व योजनांमुळे मुंबईतून बाहेर गेलेल्या मराठी माणसांना पुन्हा मुंबईत परत आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

सरकारने परवडणाऱ्या घरांसाठी नवीन धोरण तयार केले असून, ७० हजार कोटींच्या गुंतवणुकीतून ३५ लाख घरे उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यामध्ये पर्यावरणपूरक, मजबूत आणि दीर्घकालीन टिकाव असलेली घरे असतील. शिवाय, अर्धवट राहिलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात आल्या आहेत. एसआरए योजनाही सरकारी संस्थांच्या मदतीने पूर्ण होणार असून, यामुळे लाखो झोपडपट्टीवासीयांना घरे मिळणार आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घोषणांमधून मुंबईच्या सर्वांगीण विकासाचा स्पष्ट आराखडा मांडला असून, नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवण्याचे वचन दिले आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune