• Wed. Jul 23rd, 2025

NewsDotz

मराठी

पुणे जिल्ह्यात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव; प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर, लसीकरण व उपाययोजना जोरात

Jul 23, 2025
पुणे जिल्ह्यात लम्पी चर्म रोगाचा सौम्य प्रादुर्भाव आढळल्याने जिल्हा प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर गेले आहे.पुणे जिल्ह्यात लम्पी चर्म रोगाचा सौम्य प्रादुर्भाव आढळल्याने जिल्हा प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर गेले आहे.

पुणे जिल्ह्यात लम्पी चर्म रोगाचा सौम्य प्रादुर्भाव आढळल्याने जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी लसीकरण, जैवसुरक्षा व त्वरित औषधोपचार यावर भर दिला. सध्या ३०० हून अधिक जनावरांवर उपचार सुरू आहेत.

सायली मेमाणे

पुणे २३ जुलै २०२५ : पुणे जिल्ह्यात लम्पी चर्म रोगाचा सौम्य प्रादुर्भाव आढळल्याने जिल्हा प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर गेले आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित आढावा बैठकीत प्रभावी लसीकरण, जैवसुरक्षा आणि त्वरित औषधोपचार या उपाययोजना राबवण्याचे निर्देश देण्यात आले.

सध्या जिल्ह्यात एकूण ९०६ जनावरांना लम्पी विषाणूची बाधा झाली असून, यापैकी ५९१ जनावरे औषधोपचाराने बरी झाली आहेत. दुर्दैवाने १५ जनावरांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित ३०० जनावरांवर सध्या उपचार सुरू आहेत. सर्वाधिक प्रादुर्भाव शिरुर, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यांमध्ये आढळून आला आहे.

रोगाचा प्रसार रोखण्यासाठी संसर्गग्रस्त भागाच्या पाच किलोमीटर परिसरात लसीकरण करण्याचे आदेश देण्यात आले असून, मनुष्यबळ कमी असलेल्या भागात इतर तालुक्यांतून अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत.

प्रशासनाने गोठा स्वच्छता, जैवसुरक्षा आणि निर्जंतुकीकरण फवारणीवरही भर दिला आहे. लम्पी चर्मरोगासाठी आवश्यक औषधांचा पुरवठा सर्व शासकीय संस्थांमध्ये उपलब्ध असून, मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना व केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत फिरती वैद्यकीय पथके जनावरांवर उपचार करत आहेत.

पशुपालकांनी १९६२ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क करून मदतीसाठी त्वरित माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. योग्य जैवसुरक्षा, तात्काळ औषधोपचार आणि १००% लसीकरणामुळे लम्पी रोगावर नियंत्रण मिळवता येऊ शकते, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

ही उपाययोजना केवळ प्रशासनापुरती मर्यादित न राहता पशुपालकांनी देखील सहकार्य करावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune