पुण्यातील धनकवडी परिसरात मध्यरात्री तीन जणांच्या टोळक्याने 20 ते 25 वाहने फोडल्याची घटना घडली. ऑटो रिक्षा, कार, स्कूल बसची तोडफोड झाली असून दोघांना मारहाणही करण्यात आली. पोलिसांचा तपास सुरू आहे.
सायली मेमाणे
पुणे २३ जुलै २०२५ : पुणे शहर पुन्हा एकदा गुंडगिरीच्या छायेत झाकले गेले आहे. धनकवडी परिसरात मध्यरात्री साडेएकच्या सुमारास एका टोळक्याने 20 ते 25 वाहनांची तोडफोड केल्याची गंभीर घटना घडली आहे. या टोळक्याने ऑटो रिक्षा, खाजगी कार, स्कूल बस आणि पियागो टेम्पो अशा अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड असुरक्षिततेची भावना आहे.
ही घटना सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून या भागात गेल्या काही महिन्यांपासून गुन्हेगारी वाढीस लागली आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी राजू उर्फ बारक्या लोंढे या कुख्यात गुंडाने पोलीस स्टेशनमध्ये घुसून पेपर स्प्रे फवारून थेट पोलीसांवरच हल्ला केला होता. या घटनेनंतर पोलीस निरीक्षकांची बदली झाली होती, मात्र गुन्हेगारीचं सत्र थांबण्याऐवजी अधिकच बळावलेलं दिसत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या तोडफोडीत तीन जणांचा समावेश असून त्यांनी मिळून 15 ऑटो रिक्षा, 3 खाजगी कार, 2 स्कूल बस आणि 1 पियागो टेम्पोची काचफोड केली. यावेळी विरोध करणाऱ्या दोन नागरिकांना मारहाण करण्यात आली असून त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
घटना घडल्यापासून पोलीसांनी परिसरात गस्त वाढवली असून आरोपींचा शोध सुरू केला आहे. मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या टोळक्याने केशव कॉम्प्लेक्स, सरस्वती चौक आणि नवनाथ नगर या ठिकाणी वाहनांवर हल्ला केला. स्थानिक नागरिकांनी सांगितले की, हल्लेखोरांनी बिनधास्तपणे गाड्यांची तोडफोड करत आरडाओरडा केला आणि नंतर अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले.
या प्रकारामुळे पुणे शहरात पुन्हा एकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला असून पोलिसांची कार्यक्षमता आणि स्थानिक प्रशासनावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. स्थानिक नागरिकांकडून तातडीने कडक कारवाईची मागणी होत आहे, जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नयेत आणि सामान्य नागरिकांचा विश्वास प्रशासनावर टिकून राहील.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter