कोल्हापूर महापालिकेत ठेकेदाराने खोट्या सह्यांच्या आधारे ८५ लाखांचं बिल उचलल्याचा प्रकार उघड. सत्यजित कदम यांनी केला घोटाळ्याचा पर्दाफाश. चौकशी सुरू, गुन्हा मात्र अद्याप दाखल नाही.
सायली मेमाणे
कोल्हापूर २४ जुलै २०२५ : कोल्हापूर महापालिकेला ठेकेदाराचा ८५ लाखांचा चुना: बनावट सह्यांनी बोगस बिलांची उचल
कोल्हापूरमध्ये महापालिकेच्या विकासकामात मोठा गैरव्यवहार उघडकीस आला असून, एका ठेकेदाराने प्रत्यक्ष काम न करता, अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या करून तब्बल ८५ लाख रुपयांचे बिल उचलल्याचा प्रकार समोर आला आहे. या फसवणुकीची स्वतः ठेकेदाराने लेखी कबुली दिल्यामुळे महापालिका प्रशासन आणि संबंधित विभागात एकच खळबळ उडाली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे कोल्हापुरातील संघटक सत्यजित कदम यांनी या घोटाळ्याचा पर्दाफाश केला. कसबा बावडा परिसरातील प्रभाग क्रमांक २ मधील ड्रेनेज कामाच्या अनुषंगाने ठेकेदाराने बनावट दस्तऐवज आणि अधिकाऱ्यांच्या सह्यांचा वापर करत पैसे उचलल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत या फसवणुकीच्या प्रकाराबाबत सविस्तर माहिती दिली आणि ठेकेदाराच्या कबुली पत्राचा उल्लेखही केला.
प्रशासनाकडून आतापर्यंत चौकशी सुरू करण्यात आली आहे आणि तत्कालीन अधिकाऱ्यांना खुलासा मागवण्यात आला आहे. मात्र, अद्याप ठेकेदाराविरोधात कोणताही गुन्हा दाखल न झाल्यामुळे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई यांनी तर या प्रकरणात महापालिकेतील काही अधिकाऱ्यांची संलिप्तता असल्याचा संशय व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे.
महत्त्वाचं म्हणजे, कोल्हापूर महापालिकेत सध्या प्रशासक राज लागू आहे. अशा स्थितीत कोट्यवधी रुपयांचे सरकारी निधी येत असताना, बोगस कंत्राटदारांकडून शहराच्या विकासाच्या नावाखाली फसवणूक होत असल्याचं हे ताजं उदाहरण आहे. हे प्रकरण उघड झाल्यानंतर महापालिका प्रशासन किती पारदर्शक आणि जबाबदार राहील, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter