पुरंदर विमानतळ प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा संताप; फळबागा व शेती उद्ध्वस्त होण्याची भीती. सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप.
सासवड, शुक्रवार –
पुरंदर विमानतळ प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांनी जोरदार विरोध दर्शवला असून, यासाठी त्यांनी सासवडमध्ये संपाची हाक दिली आहे. विशेषतः अंजीर व सीताफळ यांच्या बागायतींसाठी प्रसिद्ध असलेल्या या भागातील शेतकरी, जमिनी गेलेल्या नंतर उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल, या भीतीने आंदोलक झाले आहेत.
शेतकऱ्यांचा सरकारविरोधी आवाज: “विकास नव्हे, विनाश!”
शेतकऱ्यांनी सरकारवर जमिनीचे वास्तव न पाहता विकासाच्या नावाखाली जबरदस्ती करण्याचा आरोप केला.
“सरकार म्हणते विमानतळामुळे विकास होईल, पण आमच्यासाठी तो विनाश आहे. आमच्या बागा आमचे पोट भरतात, सरकार आमचं पोट भरणार आहे का?” — असं एका शेतकऱ्याने सांगितलं.
नेत्यांचा सरकारवर टिकास्त्र: “शेतकऱ्यांची फसवणूक चालली आहे”
माजी पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी एस. मेमाणे यांनी स्पष्टपणे सांगितलं, “सरकारला केवळ प्रकल्प महत्त्वाचा वाटतो, शेतकऱ्यांचं आयुष्य नाही. त्यांची मानसिकता खचली आहे. सरकारने विश्वासघात केला आहे.”
दरम्यान, सरकारचा एकही प्रतिनिधी आंदोलकांना भेटला नाही, यामुळे असंतोष अधिक वाढला आहे. मात्र माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे यांनी आंदोलकांशी संवाद साधत थोडी आशा दिली आहे.
शेतीवर व पर्यावरणावर गंभीर परिणाम
विमानतळासाठी निवडलेली जमीन अत्यंत सुपीक असून, येथे अंजीर व सीताफळ उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. या जमिनी गेल्यास शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे स्रोतच नष्ट होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
“आम्हाला विकासाविरोधात काही नाही, पण तो आमच्या अस्तित्वावर घाला ठरत असेल, तर आम्ही विरोध करणारच,” असे एका शेतकऱ्याने ठामपणे सांगितले.
प्रकल्प की प्रलय? वाढतंय आंदोलन
सरकारच्या गप्प बसण्यामुळे हा प्रकल्प ग्रामीण भागातील जीवनशैली आणि शाश्वत शेतीविरोधातला संघर्ष ठरू लागला आहे. जमीन संपादनाच्या विरोधात हे आंदोलन आता व्यापक होत चालले आहे.