पुणे – महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या संयुक्त समितीच्या अहवालात पुण्यातील एका नामांकित धर्मादाय रुग्णालयाने गंभीर नियमभंग केल्याचं स्पष्ट झालं आहे. एका गरोदर महिलेला वेळेवर उपचार न दिल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
आरोग्य विभागाच्या अहवालात म्हटलं आहे की, आपत्कालीन वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध करून देणं ही धर्मादाय रुग्णालयांची जबाबदारी आहे. मात्र, रुग्णालयाने उपचार सुरू करण्याआधी मोठ्या रकमेची मागणी केल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे.
तसेच, संबंधित महिलेला अनेक तास गंभीर अवस्थेत ठेवण्यात आलं असून, ना वेळेत उपचार देण्यात आले, ना सरकारी रुग्णालयात हलवण्याची जबाबदारी घेतली गेली. शासनाच्या योजनांची माहितीही दिली गेली नाही.
रुग्णाला स्थिर केल्याशिवाय डिस्चार्ज देणं, यासारख्या त्रुटी देखील अहवालात नमूद करण्यात आल्या आहेत.
हा अहवाल पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे पुढील कारवाईसाठी पाठवण्यात आला आहे. प्रशासनाकडून दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.